नवी दिल्ली, 25 एप्रिल 2021 : देशात ऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांची अत्यधिक आवश्यकता लक्षात घेता, भारत सरकारने कामराजर पोर्ट लिमिटेडसह सर्व प्रमुख बंदरांना त्यांच्याकडून आकारले जाणारे सर्व शुल्क (जहाजाशी संबंधित शुल्क, साठवण शुल्क, इत्यादी ) माफ करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ऑक्सिजन संबंधित खालील मालास जागा वाटपात प्राधान्य देण्यास सांगितले आहे.
- मेडिकल ग्रेड ऑक्सिजन,
- ऑक्सिजन टँक्स,
- ऑक्सिजन बाटल्या,
- पोर्टेबल ऑक्सिजन जनरेटर,
- ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर ,
पुढील तीन महिने किंवा पुढील आदेशापर्यंत, ऑक्सिजन सिलिंडर आणि संबंधित उपकरणे तयार करण्यासाठी स्टील पाईप्स.
ऑक्सिजनशी संबंधित मालाला जहाजांवर जागा देण्यात प्राधान्य मिळावे, यासाठी बंदराच्या प्रमुखांना वैयक्तिकरित्या देखरेख ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या मालाची चढउतार, वहन सुरळीत व्हावे, आवश्यक मंजूरी , दस्तऐवज यांची पूर्तता होऊन हा माल बंदरातून लवकर बाहेर काढता यावा यासाठी सीमाशुल्क आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
जर जहाजात ऑक्सिजनसंबंधित वरील मालाव्यतिरिक्त इतर माल/ कंटेनर्स असतील तर ऑक्सिजनसंबंधित मालासाठी शुल्कमाफी बंदरात हाताळल्या जाणाऱ्या एकूण माल किंवा कंटेनरची संख्या लक्षात घेऊन प्रो -रेटा आधारे असावी .
अशी जहाजे, माल, बंदराच्या फाटकातून जहाज येण्याजाण्यासाठीचा कालावधी याबाबतच्या माहितीवर बंदर, मालवाहतूक व जलमार्ग मंत्रालय देखरेख ठेवेल.
भारत सरकार देशातील कोविड -19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर योग्य आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांद्वारे आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे.