कळंबस्ते : रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका संगमेश्वर येथील कळंबस्तेमधील वाडावेसराड येथे डॉ. रश्मीकांत दिपचंद गार्डी माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. समाज प्रबोधन शिक्षण संस्था मुंबई संचालित असणाऱ्या या माध्यमिक शाळेचे चेअरमन वी. ल. मोहिते, सचिव यशवंत जाधव आणि अनंत पवार, डॉ. अरुण मोहिते, किशोर मोहिते, नीलिमा जाधव, मिलिंद जाधव, ज. बा. कदम गुरुजी, मुख्याधापक प्रमोद मनोहर दळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
१० डिसेंबर २०२२ रोजी शाळेच्या भव्य पटांगणात मेळावा पार पडला. सन १९८८ ते २०२२ पर्यंतचे माजी शालांत विद्यार्थी यावेळी सहभागी झाले होते. पहिल्यांदाच झालेल्या या मेळाव्याला अंदाजे ७०० माजी विद्यार्थी उपस्थित होते. वी. ल. मोहिते यांच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. दोन सत्रात कार्यक्रम संपन्न झाला. पहिल्या सत्रात शिक्षकांच्या हस्ते शाल, संस्थेचे मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन विश्वस्त तसेच सदस्य यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांची शैक्षणिक मार्गदर्शनपर भाषणे झाली. राजेंद्र कदम यांनी भारतीय संविधानाची प्रत शिक्षकांना यावेळी भेट म्हणून दिली.
शाळेतील पहिल्या तुकडीचा विद्यार्थी आणि प्रथम दहावी उत्तीर्ण झालेल्या संतोष विष्णू बाईत यांना व्यासपिठावर मान्यवरांसोबत आसनस्थ होण्याचा मान देण्यात आला. तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला.
दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. संगमेश्वरी नमन, लावणी नृत्य, कोळी गीत, बालकलाकारांचे नृत्य आदी यावेळी सादर करण्यात आले. माजी विद्यार्थांनी त्यांचे अनुभव यावेळी कथन केले. शाळेने आपल्याला केलेली मदत, दिलेले शिक्षण, संस्कार यांचे जीवनात झालेले उपयोग याबद्दल ऋण व्यक्त केले. संगम मोहिते हे माजी विद्यार्थी म्हणाले कि, हलाखीच्या परिस्थितीत मी या शाळेत शिकलो. त्या काळात शिक्षकांनी नेहमीच मदत केली. त्यांच्याकडे शालोपयोगी साहित्य घेण्यासाठी पैसे नव्हते. दळी सरांना जेव्हा समजले तेव्हा त्यांनी तातडीने मदत केली. अशा प्रसंगांमुळे शाळेविषयी ममत्व वाढले.
दरम्यान, अजित जाधव सर, सौदालगे सर, श्री.तांबे सर, सौ.प्रियांका दळी मॅडम, माजी शिक्षक वर्ग साबणे सर, श्री. दिंडे सर,श्री.तुराई सर, सौ.गावडे मॅडम, सौ.बिर्जे मॅडम आदी शिक्षकवृंदही यावेळी उपस्थित होते. मुख्याधापक प्रमोद मनोहर दळी यांच्या मार्गदर्शनानुसार विविध कार्यक्रम घेण्यात आले. शाळेचे माजी शिपाई धर्मचंद्र(बाबू) तुकाराम मोहिते यांनी घंटानाद केला आणि माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. आजी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि ईशस्तवन म्हटले. छत्रपती शिवाजी महाराज यांची मावळ्यांसोबतची रोमांचकारी स्वारी हि अप्रतिम कलाकृती यावेळी सादर करण्यात आली.