मुंबई : महिंद्रा अॅग्री सोल्युशन्स लिमिटेड (एमएएसएल)ने `मायअॅग्रीगुरु’ हे मोबाईल अॅप शेतकर्यांसाठी सादर केले. सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत ते उपलब्ध आहे. अँड्रॉइडवर सुरू असणार्या मायअॅग्रीगुरुद्वारे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित माहिती दिली जात आहे आणि इतर शेतकरी आणि शेतीतज्ज्ञांशीदेखील संवाद साधला जात आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेतीविषयक प्रश्नांवर तातडीने सल्ला मिळणे शक्य झाले आहे. महिंद्रा अॅग्री सोल्युशन्स ही महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची उपकंपनी आहे.
महिंद्रा अॅग्री सोल्युशन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अशोक शर्मा म्हणाले की, “२०२५ पर्यंत देशातील कोट्यवधी शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे. मायअॅग्रीगुरु हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे सल्लानिहाय व्यासपीठ असणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना माहिती आणि उत्पादकता तसेच उत्तम उत्पादन आणि समृद्धी याबाबत विस्तृतपणे चर्चा करता येईल.”
महिंद्राने इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट (आयएमडी)बरोबर भागीदारी केली आहे. सलग ५ दिवस हवामानावर लक्ष ठेवले जाईल आणि हवामानावर आधारित शेतीच्या महत्त्वाच्या प्रक्रिया राबवण्यासाठी खात्री केली जाईल. मायअॅग्रीगुरुमध्ये पिके, शेतीविषयक माहिती, बाजारपेठांतील दर आणि हवामानविषयक माहिती अगदी नियमितपणे दिली जाईल.
मायअॅग्रीगुरुची ठळक वैशिष्ट्ये :
• पिके : या वैशिष्ट्यांमधील पिके हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाविषयी योग्य ती माहिती मिळावी यासाठी मदत करते.
• अॅग्री बझ : भारतातील सर्व शेतकऱ्यांना जोडणारे हे अनोखे वैशिष्ट्य असून, कुणीही शेतकरी मायअॅग्रीगुरु येथे येऊ शकतात आणि योग्य तो संवाद साधू शकतात.
• बाजारपेठेतील दर : याद्वारे शेतकऱ्यांना बाजारपेठेतील उत्पादनाची वाजवी किंमत कळते आणि त्यांना पिकांची खरेदी/विक्रीसाठी याची मदत होते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळते, थोडक्यात त्यांच्या कष्टांना योग्य किंमत मिळते.
• हवामान: या अॅपमध्ये शेतकऱ्यांना हवामानाबाबत सारी माहिती मिळू शकते आणि ही माहिती शहर/ठिकाण/जिल्हानिहाय प्राप्त होते.