ठाणे : महिंद्रा अँड महिंद्रा (एमअँडएम) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने परिपूर्ण वाहतूक सुविधा उपलब्ध करण्यासठी ठाणे महानगरपालिकेशी (टीएमसी) आज परस्पर सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या करारानुसार, ठाण्यामध्ये सर्वत्र परिपूर्ण वाहतूक सुविधा देण्यासाठी महिंद्राची इलेक्ट्रिक वाहने वापरली जाणार असून, या वाहनांमध्ये नुकतीच दाखल झालेली ट्रिओ ही इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर आणि ई-सुप्रो ही मास पॅसेंजर कॅरिअर समाविष्ट असेल. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, महिंद्रा 100 इलेक्ट्रिक वाहने देणार आहे आणि ही भागीदारी 5 वर्षे कालावधीसाठी असणार आहे.
इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या (आयएफसी) इको-सिटीज प्रोग्रॅमच्या पाठबळाने, सर्वांसाठी शाश्वत वाहतूक सुविधा देण्यासाठी परिपूर्ण यंत्रणा उभारण्याच्या उद्देशाने, महिंद्रा आणि ठाणे महानगरपालिका संयुक्तपणे काम करणार आहेत. हा एमओयू महिंद्रा अँड महिंद्रा लि. व ठाणे महानगरपालिका यांच्यामध्ये करण्यात आला.
महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका म्हणाले, “भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचे प्रवर्तक व ईव्ही मोबिलिटी सिस्टीमचे मार्गदर्शक म्हणून, हरित, स्मार्ट भविष्यासाठी आमची इलेक्ट्रिक वाहने वापरून, ठाण्याच्या शाश्वत विकासामध्ये योगदान देत असल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्यासाठी, या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी ठाणे महानगरपालिकेचे कौतुक करायला हवे. आम्ही एकत्रितपणे ठाण्यातील वाहतुकीमध्ये परिवर्तन आणू आणि स्मार्ट वाहतूक व स्मार्ट सिटीज या दिशेने वाटचाल करू, असा विश्वास आहे”.
एमओयूतील तरतुदींनुसार, ठाणे येथे स्मार्ट वाहतूक सुविधा चालवण्याच्या दृष्टीने, परिपूर्ण सेवेचे प्रमाण वाढवण्यासाठी महिंद्रा आपली वाहने उपलब्ध करणार आहे, तसेच दैनंदिन वाहन व चालक व्यवस्थापन सेवा देणार आहे. महिंद्रा निरनिराळ्या प्रकारची वाहने एकाच व्यासपीठावर एकत्र आणणार आहे. नागरिकांना या वाहनांचा लाभ घेण्याची सुविधा बुकिंगद्वारे दिली जाणार आहे. यासाठी अनुकूल असणारी यंत्रणा पुरवण्यासाठी आणि चार्जिंग स्टेशन बवसवण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी व जागा उपलब्ध करण्यासाठी ठाणे महानगरपालिका आवश्यक तो पाठिंबा देणार आहे.
या एमओयूचा भाग म्हणून, ठाणे महानगरपालिका इलेक्ट्रिक वाहनांसाठी महिंद्राने प्रस्तावित केलेल्या चार्जिंग सुविधा ठिकाणांपासून जवळ पार्किंग सुविधाही उपलब्ध करणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी विजेचे दर कमी असावेत आणि या प्रकल्पाची सुरळित अंमलबजावणी व्हावी, यासाठी टीएमसी पॉवर युटिलिटी कंपन्या व अन्य नियामकांशी समन्वय साधणार आहे.