मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या हरित मिशन कार्यक्रमात सहभागी होऊन शासनाचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्राने आपले योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महिंद्रा हरियाली कार्यक्रमांतर्गत महिंद्रा समुहाने २००७ पासून आजपर्यंत देशभरात १ कोटी ३० लाख झाडे लावली आहेत. या कार्यक्रमांतर्गत आज मुख्यमंत्री फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरळी येथील महापालिकेच्या आद्य शंकराचार्य उद्यानात रुद्राक्षाची रोपे लावली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महिंद्रा समुहाचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
महिंद्रा हरियाली उपक्रमाचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले की, जल, जमीन आणि जंगल संवर्धनातून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महाराष्ट्राने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली महत्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. राज्यात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनक्षेत्र हवे, आज ते २१ टक्के इतके आहे. ते ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम नियोजनपूर्वक व पारदर्शक पद्धतीने हाती घेण्यात आला आहे. तीन वर्षात आपल्या सर्वांना मिळून राज्यामध्ये ५० कोटी वृक्ष लागवड करावयाची आहे. वृक्ष लागवडीच्या कामात पारदर्शकता यावी म्हणून लावलेल्या प्रत्येक झाडाला जिओ टॅगिंग केले आहे. मिशनमोड स्वरूपात हा कार्यक्रम वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हाती घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात जलयुक्त शिवार योजना, मृद संधारणाची कामे आणि वृक्षलागवड हे तीन विषय प्राधान्यक्रमावर घेण्यात आले आहेत. गेल्यावर्षी राज्यात ५ हजार टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करावा लागला होता. जलयुक्त शिवार योजनेमुळे यावर्षी ही संख्या ५०० इतकी कमी झाली. या योजनेतून ११ हजार गावे आपण टंचाईमुक्त करू शकलो आहोत. येत्या दोन वर्षात आणखी १० ते ११ हजार गावे आपण टंचाईमुक्त करणार आहोत. राज्यातील जलस्त्रोत सक्षम करण्याचे कामही शासन करत आहे. नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत चंद्रभागेचे प्रदूषण दूर करून नदीत केवळ प्रक्रिया केलेले पाणीच जाईल यादृष्टीने शासन काम करत आहे. या नदीच्या दोन्ही काठांवर महिंद्राने वृक्ष लागवड करावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कोकणातील ५ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. महिंद्राच्या सामाजिक दायित्व भावनेचे, ग्रामविकासातील त्यांच्या योगदानाचे अभिनंदन करतांना मुख्यमंत्र्यांनी आपण सर्व मिळून या वसुंधरेचे रक्षण करूया असे म्हटले.
राज्यात ४ कोटी पेक्षा अधिक झाडे लागतील- सुधीर मुनगंटीवार
राज्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दि. १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवडीचा करण्यात आलेला संकल्प नक्की यशस्वी होईल आणि या कालावधीत संकल्पापेक्षा अधिक वृक्ष लागवड होईल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.
लोक फक्त धनाचा विचार करत असतांना महिंद्रा समुहाने वनालाही महत्वाचे मानत वृक्ष लागवडीचे काम हाती घेतले असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, वृक्ष लागवड कार्यक्रमात लोकांचा सहभाग आणि विश्वास वाढावा यासाठी लावलेल्या प्रत्येक झाडाची अक्षांश-रेखांशासह संकेतस्थळावर नोंदणी करण्यात येत आहे. वृक्ष तोडणाऱ्या हातांपेक्षा वृक्ष लावणाऱ्या आणि जगवणाऱ्या हातांची संख्या वाढविली जात आहे. शासनाच्या या मिशनमध्ये समाजाच्या सर्वस्तरातील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचे व त्यांचा उत्साह प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.
अर्थशास्त्र मोठे की पर्यावरणशास्त्र मोठे याचे उदाहरण देऊन श्री.मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवड कार्यक्रमातील महत्वाचे टप्पे विशद केले. औरंगाबाद येथे काल इको बटालियन स्थापन झाली असून शेतकऱ्यांपासून लष्करापर्यंत सर्वजण जय जवान-जय किसान चा नारा देत पर्यावरण रक्षणाच्या कामात सहभागी होत असल्याचे सांगतांना राज्याचे हे काम केवळ देशात नाही तर जगासाठी पथदर्शी ठरावे इतके चांगले काम आपल्या सर्वांच्या हातून व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा हरियाली कार्यक्रमाची माहिती दिली