मुंबई, 16 जून : सुमारे 20.7 अब्ज उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहातील महिंद्रा अँड महिंद्रा लि. या कंपनीने आज लोकप्रिय अशा ‘सुप्रो व्हॅन’च्या ‘प्लॅटफॉर्म’वर बनविण्यात आलेली ‘बीएस-सिक्स सुप्रो अॅम्ब्युलन्स’ बाजारात आणण्याची घोषणा केली. ही रुग्णवाहिका ‘एलएक्स’ आणि ‘झेडएक्स’ या दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध असून तिची किंमत 6.94 लाख रुपये (एक्स-शोरूम मुंबई) इतकी आहे. ग्राहकांसाठी ही किंमत आकर्षक ठरणार आहे.
कोविड-19 विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र सरकारला रुग्णवाहिकांची मोठी गरज भासत आहे. ती पूर्ण करण्यासाठी नव्या सुप्रो रुग्णवाहिनीचे पहिल्या बॅचचे उत्पादन खास सरकारसाठीच करण्यात आले.
सारांश
- या श्रेणीतील सर्वात जास्त परवडणारी बीएस-6 डिझेल रुग्णवाहिका
- ‘एआयएस 125’ मापदंडांद्वारे प्रमाणित, ‘बी’ प्रकारातील रुग्णवाहिका
- रुग्ण व चालकाव्यतिरिक्त 5 परिचरांची सोय
- शहरांतील वाहतुकीमध्ये सहज वावरण्यासाठी नेटके आकारमान
- विशेष प्रारंभिक किंमत रु. 6.94 लाखांपासून सुरू (एक्स-शोरूम, मुंबई)
- या श्रेणीतील अग्रणी अशी 2 वर्षे किंवा 60,000 किमीची (जे अगोदर येईल, त्याची) वॉरंटी
- महाराष्ट्र शासनाच्या तातडीच्या गरजा भागविण्यासाठी पहिला ताफा रवाना
‘एम अँड एम लिमिटेड’च्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीजय नाकरा म्हणाले, “एक काळजीवाहू आणि जबाबदार कॉर्पोरेट नागरिक या नात्याने महिंद्रा कंपनी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणून त्यांना प्रगती करण्यास प्रोत्साहन देऊ इच्छिते. रुग्णांना सुरक्षितपणे व वेळेत हलविण्यासाठी वैद्यकीय सेवेतील व्यक्तींना मदत करण्याकरीता सुप्रो रुग्णवाहिका सादर करणे ही आमच्या या तत्वज्ञानाचीच प्रचिती आहे. फेसमास्क, व्हेंटिलेटर आणि सॅनिटायझर्स बनविण्याव्यतिरिक्त ‘कोविड-19’विरुद्धच्या लढ्यातील महिंद्राचे हे आणखी एक योगदान आहे.”
नाकरा पुढे म्हणाले, “करोना साथीशी लढा देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांत सहभागी होता आले याचा आम्हाला आनंद आहे. पहिला 12 वाहनांचा ताफा विक्रमी वेळेत उत्पादित करण्यात आला असून तो सरकारकडे रवाना झाला आहे. इतर अनेक सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट्स यांनीही सुप्रा अॅम्ब्युलन्स खरेदी करण्यात रस दर्शविला आहे. म्हणूनच, ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची क्षमता लवकरच वाढवित आहोत. सर्व आवश्यक उपकरणांसह सर्व प्रकारच्या मापदंडांचे पालन करणारी सुप्रा ही सर्वात स्वस्त रुग्णवाहिका आहे.”
‘सुप्रो अॅम्ब्युलन्स’बद्दल
‘सुप्रो अॅम्ब्युलन्स’मध्ये फोल्डेबल स्ट्रेचर कम ट्रॉली, मेडिकल किट बॉक्स, ऑक्सिजन सिलिंडर, अंतर्गत प्रकाशयोजनेसह अग्निशामक यंत्र, अग्निप्रतिरोधक अंतर्गत रचना आणि उद्घोषणेची प्रणाली अशी सर्व आवश्यक उपकरणे आहेत. बाहेरील भागाचा विचार करता, ही रुग्णवाहिका ‘एआयएस-125’ प्रमाणित ‘रेट्रो रिफ्लेक्टीव्ह डिकल्स’, 75 टक्के फ्रोस्टेड विंडोज, सायरन व बीकन लाइट यांनी सुसज्ज आहे.
ही रुग्णवाहिका वैद्यकीय व आरोग्य सेवेमध्ये, विशेषत: सध्याच्या जागतिक साथीच्या आजारात उपयोगी पडेल अशा प्रकारे विकसित केली गेली आहे. ‘महिंद्रा’चे शक्तिशाली ‘डीआय इंजिन’ या रुग्णवाहिकेसाठी वापरण्यात आले आहे. ते 47 एचपी आणि 100 एनएम टॉर्क वितरीत करते. रुग्णवाहिकेच्या नेटक्या आकारमानामुळे ती देशातील लहान रस्त्यांवरूनही सुलभतेने जाऊ शकेल. त्यामुळे गंभीर रूग्णांची ने-आण अतिशय वेगात होऊन त्यांचा जीव वाचण्यात मदत होईल.
याव्यतिरिक्त, सुप्रो रुग्णवाहिकेवर 2 वर्षांची अथवा 60 हजार किलोमीटरची अपवादात्मक अशी वॉरंटी देण्यात आली आहे. उदय या योजनेतील सदस्यांना रुग्णवाहिकेच्या खरेदीवर इतर लाभांसह 10 लाख रुपयांचा आजीवन विमा मिळतो. त्याचबरोबर, महिंद्राच्या वितरकांचे जाळे आणि त्यांचे तंत्रज्ञ रुग्णवाहिकेची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी उपलब्ध आहेतच.
आजमितीस, ‘सुप्रो ब्रँड’च्या माध्यमातून विविध प्रकारच्या बॉडी स्टाईल, इंजिनांचे व इंधनांचे पर्याय असलेली प्रवासी आणि मालवाहू वाहनांची विस्तृत श्रेणी विविध स्तरांतील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.