मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लि. या 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने वर्धा येथे शाश्वत शेती विकसित करण्यासाठी, नांदी फाउंडेशन या भारतातील एका झपाट्याने वाढत्या व सर्वात मोठ्या सामाजिक संस्थेशी सहयोग केल्याचे जाहीर केले आहे.
महिंद्रा समूहाचा एक प्रमुख कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी कार्यक्रम म्हणून वर्धा फॅमिली फार्मिंग प्रोजेक्ट (डब्लूएफएफपी) सुरू करण्यात आला. डब्लूएफएफपी प्रकल्पाने डाळिंबाचे पहिले पीक घेतले असून या वर्षी मे व जुलै या दरम्यान डाळिंबे काढण्यात आली.
डब्लूएफएफपीची सुरुवात 2015 मध्ये झाली व तेव्हापासून या कार्यक्रमात, जमिनीची मशागत, पिकांसाठी ठिबक सिंचन व्यवस्था बसवणे, कुंपण घालणे व आंतरपिके घेणे, बायो-डायनॅमिक फार्मिंग करणे व क्षमताविकास असे अनेक टप्पे पूर्ण करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना चांगला रोजगार देईल, अशा शाश्वत शेतीचे तंत्र विकसित करण्यास शेतकऱ्यांना मदत करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात,, 79 गावांतील अंदाजे 1000 एकर शेतीचे रूपांतर कमी उत्पन्न देणाऱ्या कापसातून अधिक उत्पन्न देणाऱ्या डाळिंबामध्ये करण्यात आले. महिंद्रा व नांदी यांनी केलेल्या या प्रयत्नांमुळे अंदाजे 750 शेतकरी कुटुंबांना फायदा झाला आहे व त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे.
या पहिल्या पिकामुळे, प्रकल्पाच्या अडीच वर्षांच्या काळात, शेतकऱ्यांचे उत्पन्न शून्य ते प्रति एकर अंदाजे 60,000 रुपये इतके वाढवण्यास मदत झाली. महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लि. (एमएएसएल) ही एमअँडएमची संपूर्ण मालकीची उपकंपनी, या प्रकल्पासाठी कार्यक्षम व शाश्वत मार्केट लिंकेज निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.
महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शर्मा यांनी सांगितले, “महिंद्राचा भारतातील शेतकऱ्यांशी दीर्घ कालावधीपासून सहयोग आहे. शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण करणे व त्यांना शाश्वत शेतीद्वारे सुरक्षित रोजगार मिळवण्यासाठी मदत करणे, हे वर्धा फॅमिली फार्मिंग प्रोजेक्ट सुरू करण्यामागील उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये लक्षणीय परिणाम साधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यामुळे ग्रामीण भागातील भरभराटीलाही चालना मिळणार आहे.”
शर्मा यांनी नमूद केले, “शेतकऱ्यांना मदत करतील आणि त्यांच्यासाठी आशा व भरभराट आणतील, असे आणखी काही उपक्रम राबवण्याची प्रेरणा आम्हाला डाळिंबांच्या पहिल्या पिकामुळे मिळाली आहे. खरे तर, फार्मिंग 3.0च्या नव्या टप्प्यामध्ये, शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती देणे व त्यांना वेळोवेळी आवश्यक ती माहिती पुरवून त्यांच्या उत्पन्नात व उत्पादकतेमध्ये वाढ करणे, हे आमचे लक्ष्य आहे.”
नांदी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार यांनी सांगितले, “आरकू कॉफी प्रकल्पाप्रमाणे, नांदीने मांडलेल्या बऱ्याचशा गोष्टी आधी अशक्य वाटतात. त्यामुळे, विदर्भातील भागामध्ये शेकडो लहान शेतकरी कुटुंबांना एकत्र आणणे आणि त्यांना जागतिक दर्जाच्या ऑरगॅनिक डाळिंबांचे उत्पादन घेण्यासाठी शेतीचे नवे, परिवर्तनशील शाश्वत स्वरूप समजून सांगणे, हे निश्चितच आव्हानात्मक होते. सुदैवाने, महिंद्रा समूहाने द्रष्ट्या नजरेने या विषयाकडे पाहिले व भारतीय शेतीसाठी हा पूर्णतः नवा प्रकार प्रत्यक्षात साकारण्यासाठी आम्हाला मोठी मदत केली. 3 वर्षांहून कमी काळामध्ये, पर्जन्यछायेसारख्या भूभागामध्ये आमचा प्रकल्प म्हणजे वाळवंटामध्ये सापडणाऱ्या मृगजळाप्रमाणे वेगळा ठरला आहे. शेतकऱ्यांना डाळिबांचे पहिले पीक मिळाले असल्याने व त्यांनी विक्रमी किंमत मिळवली असल्याने ते आनंदी आहेत. “रेड रुबीज रिव्होल्युशन” नुकतीच सुरू झाली आहे आणि भारतातील शेतीच्या पुनरुत्थानामध्ये वर्धा हे केंद्र असेल, असे आम्हाला वाटते.”
महिंद्रा सातत्याने शेतकऱ्यांबरोबर काम करत आहे, तज्ज्ञांशी सल्लामसलत करत आहे व क्षमताविकास करत आहे. या प्रकल्पाने ‘राइज फॉर गुड’, चांगल्यासाठी कृती करण्याचे आवाहन केले आहे.