रत्नागिरी, 29 may : रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे एका महिलेवर जीवघेणा हल्ला करून झाडावर दबा धरून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाग तसेच ग्रामस्थांना यश आलं. मात्र तपासणीसाठी नेत असताना या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. बिबट्याला पकडतानाचा थरार अंगावर शहारे आणणारा होता. त्यात या बिबट्याने वनविभागाच्या अधिकारी प्रियांका लगड यांच्यावर झडप मारून त्यांनाही जखमी केलं आहे.
शुक्रवारी दुपारी निवळीतील एक महिला काजू काढण्यासाठी रानात गेली होती. यावेळी एका बिबट्याने या महिलेवर हल्ला केला. या महिलेच्या चेहऱ्यावरच बिबट्याने पंजा मारला. यावेळी या महिलेने आरडाओरडा केला, ओरडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर पोलिस पाटील यांना याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान जिल्हा परिषदचे सदस्य परशुराम कदम यांना ही माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी हजर झाले व जखमी महिलेला उपचारासाठी नेले, तसेच वन विभागाला याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या रेंजर प्रियांका लगड व वनविभागाचे कर्मचारी राजेंद्र पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर झाडावर दबा धरून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आले. याचवेळी झाडावरून उतरलेला बिबट्या बांधाच्या कडेला जाऊन बसला. स्थानिकांना बरोबर घेऊन वनाधिकारी प्रियांका लगड यांनी त्याच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. याची चाहूल लागताच बिबट्याने लगड यांच्यावरच हल्ला केला. याचवेळी वन कर्मचारी राजेंद्र पाटील यांनी बिबट्यावर झडप घातली आणि त्याची मान पकडली, त्यानंतर इतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी बिबट्याचे पाय, तोंड बांधले आणि बिबट्याला जेरबंद केलं. मात्र या हल्ल्यात वनाधिकारी लगड यांच्या पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान या बिबट्याला पकडण्यासाठी या भागातील ग्रामस्थ विटूमामा नितोरे,किसन नितोरे,संतोश नितोरे,अमीत गावडे,सागर कदम,मयुर कदम व जिल्हा परिषद सदस्य परशुराम कदम यांनी वनविभागाला मदत केली.
दरम्यान जेरबंद केल्यानंतर बिबट्याला तपासणीसाठी नेताना त्या बिबट्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.