मुंबई, (निसार अली) : मालाडमध्ये राहणााऱ्या हिमानी शर्मा या महिलेने राहत्या सोसायटीत, पोलीस ठाण्यात गोंधळ घातला आणि कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातही वाद घालून पारिचारिकेला मारहाण केली. तिच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तसेच विविध कलम लावण्यात आली आहे. पारिचारिकेला केलेल्या मारहाणीमुळे रुग्णालय कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे रुग्णांचे हाल झाले.
राहत्या सोसायटीत मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास हिमानी गोंधळ घालत होती. याबाबत पोलिसांना 100 क्रमांकावर दूरध्वनीवर माहिती मिळाली. तिला मालाड पोलीस ठाण्यात आणल्यावर तिने पोलिसांशी वाद घातला आणि शिवीगाळ केली. कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 20 जून रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास तिला आणण्यात आले. यावेळी पारिचारिकेशी वाद घालत हिमानीने तिला मारहाण करत तोडफोडही केली. पारिचारिकेला सोडविण्यासाठी आलेल्या पोलिसालाही तिने मारहाण केली. तसेच डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ केली. सकाळी 8 वाजेपर्यंत गोंधळ घालत होती. सहकार्याला झालेल्या मारहाण प्रकरणी रुग्णालय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे रुग्णालयाचे कामकाज ठप्प झाले.
सकाळी सहा वाजल्यापासून ओपीडीचा केस पेपर काढण्यासाठी रांग लावलेल्या सर्व रुग्णांना रुग्णालयातून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले त्यामुळे तिथं उपस्थित शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक ही संतापले. त्यांनीही आरडाओरडा सुरू केला. दरम्यान, हिमानीच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.















