मुंबई: विक्रोळी टागोर नगर येथे शिवसेनेचे उमेदवार उपेंद्र सावंत यांचा प्रचार सुरू असताना माणुसकीचे दर्शन त्या ठिकाणी पाहायाला मिळाले. भर रस्त्यात प्रसूत झालेली एक महिला प्रचारात सहभागी झालेल्या तीन महिला शिवसैनिकांनी पाहिली आणि त्यांनी तातडीने तिच्या मदतीसाठी धाव घेतली आणि तिच्यासह बाळाचे प्राण वाचविले. त्यांनी केलेल्या या कामगिरिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याबाबतची माहिती अशी की, प्रचाराच्या ठिकाणापासून जवळच एक गर्भवती महिला वेदनेने कळवळत होती. याचवेळी अचानक तिची भररस्त्यावरच प्रसूती झाली. प्रचारात सहभागी असणार्या तीन महिला शिवसैनिकांनी तो प्रकार पाहिला आणि मदतीसाठी धाव घेतली. तोपर्यंत महिलेच्या उदरातून मूल जन्माला येऊन ते रस्त्यावर पडले होते. बाळाचे नशीब बलवत्तर की त्या शिवसैनिकांपैकी एक परिचारिका निघाली. अनुभवाचा उपयोग करत तीने तातडीने उपचार केले आणि बाळाची नाळ कापली. तरिही मुलाच्या जीवाला धोका कायम होता . तेव्हा तातडीने शिवसैनिकांनी धावपळ केली. रुग्णवाहिका बोलावली आणि विद्याविहार येथील राजवाडी रुग्णालयात तिला दाखल केले. अखेरिस सर्व प्रयत्नांना यश येत आईसह बाळाचे प्राण वाचले.
आशा पवार (वय-२७) असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे. बांधकाम चालणार्या एका इमारतीवर ती काम करते आणि टागोर नगर येथे भावाकडे राहते. दुपारच्या सुमारास ती शनी मंदिरात जात होती. याचवेळी रस्त्यावरच तिला प्रसूती कळा मारू लागल्या आणि ती प्रसूत झाली. तिथे श्रद्धा रुके, मधुरा जोशी, वासंती शिंदे या महिला शिवसैनिकांनी तिला पाहिले. क्षणाचाही विचार न करता त्यांनी प्रचार सोडला आणि मदतीसाठी धाव घेतली. श्रद्धा रुके या व्यवसायाने पारिचारिका आहेत. त्यांच्यामुळेच या महिलेला वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले. मदत वेळेवर मिळाली नसती तर बाळाला जंतूसंसर्ग होण्याची भिती होती.
शिवसैनिक नेहमीच वेळप्रसंगी मदतीसाठी धावून जातो, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गर्भवतीस तातडीने मदत करणार्या महिला शिवसैनिकांचा सत्कार करू, असे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांनी सांगितले.
पालिकेचे रुग्णालय बंद पडल्यानेच राजावाडीत जाण्याची वेळ
पालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसूतीगॄह टागोर नगर येथे आहे. स्थानिक रहिवाशांच्या विरोधानंतरही महापालिकेने अचानक ते बंद केले. महिलेची प्रसूती झाली तेथून काही अंतरावरच हे रुग्णालय आहे. हे रुग्णालय बंद झाले नसते तर महिलेला विद्याविहार येथील पालिकेच्या रुग्णालयात नेण्याची गरज भासली नसती. परंतु, आंबेडकर रुग्णालय बंद झाल्यानेच महिलेला राजावाडीत दाखल करण्याची आफत ओढावली. जर या महिलेचे बरेवाईट घडले असते तर त्याला पालिका प्रशासनच जबाबदार ठरले असते, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव ससाणे यांनी दिली.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
“डॊ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रसूतीगृह दुरुस्तीसाठी बंद केले गेले आहे. फक्त क्षयरोगाचा विभाग सुरू आहे. तातडीच्या उपचारासाठी आम्ही रुग्णवाहिका ठेवली आहे. अशा प्रकारच्या रुग्णांना आम्ही शीव आणि राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी पाठवितो.” – प्रज्ञा जाधव, मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॊ. आंबेडकर प्रसूतीगृह
>>>>>>>>>>>>>>>>>>>