मुंबई : पालिका के – पश्चिम विभागातील कंत्राटी महिला कामगार सुमती देवेंद्र यांना पालिकेने काम नाकारल्याने त्यांनी आत्महत्या केली, असा आरोप कचरा वाहतूक संघाने करत पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी ठिय्या मांडला. शेकडो कामगारांनी यावेळी सुमती यांचा मृतदेह घेऊन मुख्यालयासमोर आल्याने काहीकाळ वातावरण तंग झाले होते. दरम्यान या मागणीसाठी पुढील महिन्यापासून भीक मांगो आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
कचरा वाहतूक संघाच्या न्यायालय यादीतील संरक्षण असलेल्या कामगार सुमती देवेंद्र (२८) ही महिला के (पश्चिम) विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होती. न्यायालयाचे संरक्षण असतानाही मागील काही महिन्यांपासून तीला पालिकेने काम नाकारले. नियमानुसार अशा कामगारांना २२ हजार वेतन मिळायला हवे. तर किमान वेतन नियमानुसार १५ हजार रुपये मिळणे आवश्यक होते. मात्र तसे न करता, सहा ते आठ हजार रुपये एेवढे तुटपुंजे वेतन दिले जात होते. तुटपुंज्या वेतनात ही कुटुंब चालवणाऱ्या या महिलेचे किमान वेतन थकबाकीचे एक लाख रुपयेही पालिकेने थकवले आहेत. त्यात काम केल्याचे वेतनही सहा महिन्यांपासून दिलेले नाही. त्यामुळे संरक्षण असतानाही नोकरी नाकारली जात असल्याने व घर चालवणे कठीण झाल्याने कंटाळून या महिलेने आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून पालिका अधिकाऱ्यांनी केलेली हत्या आहे, असा आरोप संघटनेने आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे. तसेच न्यायालयाचे संरक्षण असणाऱ्या या कामगारांना पालिकेने काम द्यावे आणि असे प्रसंग टाळावेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही संघाने केली आहे.