मुंबई: दिलीप करंडे फाऊंडेशन व अवनी फाऊंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने शनिवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत , मराठी भाषा भवन, मुंबई विद्यापीठ , कालिना सांताक्रुझ येथे लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध उपाययोजनेकरिता “पोष फॉर वूमन” हे महिला जागृती चर्चा सत्र आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर उपस्थित राहणार असून शिवसेनेच्या आमदार डॉ मनीषाताई कायंदे, नगरसेविका व मनपा सभागृह नेत्या विशाखा राऊत व आईस ग्लोबल लीडरशिप कोचच्या संचालिका व कॉर्पोरेट ट्रेनर डॉ. सुष्मा गायकवाड यांची या चर्चासत्रात प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सिनेट सदस्य डॉ. सुप्रिया करंडे ,प्रवीण पाटकर व मनपा शिक्षण समितीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांच्या पुढाकाराने हे चर्चासत्र होणार असून प्रमुख पुरुष प्रवक्ते कॉर्पोरेट ट्रेनर सोनू बजाज निवृत्त एसीपी, तसेच वकील व सल्लागार डॉ सुधाकर पुजारी असणार आहेत.
” भारतीय समाजात कधी नव्हे ते ‘मी टू’ चे वादळ घोंघावत हजारो वर्षांपासून अन्याय अत्याचार मुकाटयाने सहन करणारी भारतीय महिला आता लैंगिक शोषणाविरोधात मी टू’ च्या माध्यमातून बोलती होत आहे. काही वर्षांपूर्वी आपले लैंगिक शोषण झाले आहे, म्हणून तक्रार करण्यास घाबरणारी हीच महिला, तक्रार केल्यास समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काय असेल? याची भीती वाटणारी ही महिला, आज आपल्यावर अन्याय झाला, आपले लैंगिक शोषण झाले, याची जेव्हा तक्रार करते, तेव्हा भारतीय समाजातील ही एक मुक्त माध्यमाची क्रांतीच म्हणावी लागेल असे मत शिवसेनेच्या आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले. ‘मी टू’ या मुक्तमाध्यमांवरील अभिव्यक्तीला सध्या एका चळवळीचे रूप आल्याचे दिसत असून लैंगिक शोषण झालेल्या अनेक महिला मुक्तमाध्यमांवर म्हणजेच सोशल मीडियावर मुक्तपणे अन्यायाविरुद्ध धाडसाने बोलत आहेत या मुक्तमाध्यमांची दखल आता पोलिस स्टेशन , महिला आयोग व न्यायालये घेतील का ? याचा उहापोह या चर्चासत्रात केला जाईल.
या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.