एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
रत्नागिरी : ‘मलाला यूसुफझाई ही आजच्या काळातली सावित्री आहे असे मी मानतो. शिक्षण मिळविण्यासाठी तिने घेतलेल्या भूमिकेची आणि तिच्या निर्धाराची दखल संपूर्ण जगाने घेतली. अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया आपल्या आजुबाजूला आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे,’ असे प्रतिपादन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून अॅड. विनया घाग, प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे उपस्थित होते.
श्री. हेगशेट्ये म्हणाले, ‘महिला दिन हा फक्त साजरा करू नका, तर किमान दोन-तीन महिलांचे चारित्र्य वाचा, त्यांचा आदर्श घ्या. आपल्या आयुष्याचा उद्देश हा केवळ नोकरी करणे, पैसा कमावणे एवढाच असू नये, तर चौफेर वाचनाने आपले जीवन संपन्न करणे आणि दुसऱ्याचे आयुष्य घडवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बुरसटलेल्या वृत्तीच्या विरोधात सावित्रीबाई फूलेंनी आवाज उठवला. स्वत: शिकल्या आणि शाळा उघडल्या, देशाच्या बदलाचा हा खरा इतिहास आहे. फातिमा शेख ही सावित्रीबाईंच्या शाळेतील पहिली शिक्षिका. त्यांच्या जोडीला तितक्याच ताकदीने उभी राहलेली महिला. त्यांच्यामुळे आज लाखो, कोट्यवधी महिला शिकून पुढे येत आहेत. स्त्रियांनी आपले कर्तृत्व सरस असल्याचे दाखवले आहे. जिजाऊंनी छत्रपतींना घडवले आणि त्यांनी संपूर्ण भरतखंडात साम्राज्य उभे केले. माणूस जपण्याची शिकवण त्यांना जिजाऊंनी दिली. पहिला माणूस, मानवता हा दृष्टिकोन त्यांना देणारी जिजाऊही महत्त्वाची आहे.’
प्रमुख पाहुण्या अॅड. घाग यांनी दिवाणी, फौजदारी कायद्याची सविस्तर माहिती देतानाच समाजात चालणाऱ्या विकृतीकडेही लक्ष वेधले. वेगवेगळे कायदे आणि त्याअंतर्गत असलेल्या शिक्षेची तरतूद याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. जगदाळे यांनी आपल्या हातात असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर स्वत:च्या कर्तृत्वासाठी करा आणि आयुष्यात ऊंची गाठा, असे आवाहन केले. प्रारंभी सावित्रीबाई फुले आणि जिजामाता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. पूर्णिमा सरदेसाई यांनी केले. आभार प्रा. सोनिया म्हापुसकर यांनी मानले. या वेळी प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.