
ठाणे :साहित्याच्या सर्व प्रकाराचा वापर कोकण मराठी साहित्य परिषद कार्यक्रमांतून करत असते. पण केवळ साहित्य कोजागरी करून भागणार नाही. कारण मराठीची दारूण परिस्थिती आहे. त्याचा विचार आज आपल्याला करायला हवा.’ मराठी भाषा शिक्षण कायदा आणि प्राधिकरण त्वरित होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषाप्रेमींनी व साहित्यसंस्थांनी रोज मराठीचा जागर करत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष महेश केळुसकर यांनी ठाणे येथे कोमसाप, ठाणे आयोजित साहित्यिक कोजागरीत केले.
तसेच मराठी शाळांची परिस्थिती बिकट झालीय.अजून मराठी भाषेला अभिजात दर्जाही मिळालेला नाही. मालगुंडला पुस्तकांचं गाव करण्याचा सरकारचा प्रस्ताव अध्याप झालेला नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी जेष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ. अनंत देशमुख, कवी प्रशांत डिंगणकर, अभिनेते संजय क्षेमकल्याणी, शशिकांत तिरोडकर आणि कोमसाप ठाणेच्या अध्यक्षा मेघना साने उपस्थित होत्या.
डॉ. अनंत देशमुख यांच्या ‘ शोधयात्रा ‘ या कादंबरीवर आधारित मेघना साने आणि संगीता कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली. त्यात देशमुख यांचा साहित्यिक व संशोधनाचा प्रवास रसिकांसमोर उलगडला.
प्रशांत डिंगणकर यांनी डॉ. महेश केळुसकर यांच्या जोर की लगी है यार “या कथासंग्रहाचे रसग्रहण केले. तर अभिनेता संजय क्षेमकल्याणी यांनी जोर की लगी है यार या कथेचे अत्यंत प्रभावी व अभिनयपूर्ण अभिवाचन केले. त्याला श्रोत्यांची चांगलीच दाद मिळाली. यावेळी ज्येष्ठ कवी दामोदर दळवी यांचा मालवणी संस्कृतीचे लेणे हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला. तसेच कोमसाप साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रदर्शनही भरवले होते . या कार्यक्रमात लोकसाहित्याचे अभ्यासक सदानंद राणे,कोमसाप मुंबई उपनगर अध्यक्ष शिवाजी गावडे हे मान्यवर उपस्थित हेते.रसिकांना केसरी दूध देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा बोर्डे यांनी केले.तर स्नेहा शेडगे आणि मनिषा चव्हाण यांनी सभागृहाची व्यवस्था पाहिली.















