
रत्नागिरी : महावितरणच्या विरोधात आज सोमवारी गावखडीवासीयांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. रत्नागिरीतील महावितरणच्या मुख्य कार्यालयाबाहेर हे उपोषण करण्यात आलं. गावखडीमध्ये पावसमार्गे 11 के व्ही विद्युतलाईन टाकावी अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे, मात्र महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या निषेधार्थ हे उपोषण केलं.
25 वर्षांपूर्वी पावस उपकेंद्रामधून गावखडीसाठी वीजपुरवठा सुरू होता. नंतर तो खंडित करून धारतळे उपकेंद्रातून देण्यात आला. मात्र काही भौगोलिक व अन्य तांत्रिक कारणामुळे हा वीजपुरवठा सतत खंडित होऊन वारंवार अनियमित होत असतो असतो, त्यामुळे अनंत अडचणींना सामोरे जावं लागतं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे पावस उपकेंद्र ते गावखडी पर्यंत 11 केव्ही केबल लाईन टाकून गावखडीसाठी वीजपुरवठा केला जावा यासाठी ग्रामस्थांनी वारंवार विधायक मार्गाने मागणी केली. मात्र महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडून याबाबत दिरंगाई केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात हे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. पावस उपकेंद्र ते गावखडी पर्यंत 11 केव्ही केबल लाईन लवकरात लवकर टाकून मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.