मुंबई : भगवान महावीर यांनी जीवनाचे तत्वज्ञान शिकवले आहे. त्यांनी दिलेले विचार चिरंतन आहेत. निसर्ग प्रकृतीच्या विरूध्द जाऊन वागलो तर प्रकोपाला सामोर जावे लागेल. त्यामुळे निसर्ग नियमाप्रमाणे जगा आणि जगू द्या हा संदेश महावीरांनी दिला. तो सर्वांनी आपल्या आचरणात आणावा. भगवान महावीर यांच्या विचारातच विज्ञान होते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
ऑगस्ट क्रांती मैदान येथे महावीर जयंती निमित्त श्री गोवालिया टँक जैन संघ आणि समस्त जैन संघ आणि सामाजिक संस्था यांच्या वतीने आयोजीत कार्यक्रमा़त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नयनपद्मसागर महाराज होते. यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.हर्षवर्धन, मीरा-भाईंदरच्या महापौर गीता जैन अमृता फडणवीस यांच्यासह देशाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे न्यायाधीश, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांच्यासह जैन समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे मान्यवर आणि जैन समाजाची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भगवान महावीर यांनी दिलेल्या विचारांच्या वाटेवर आपण चालले पाहिजे. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता हा विचार सर्वांनाच आवडतो म्हणूनच आज या विचाराला लोकांनी साथ दिली आहे. आज ‘ग्लोबल वार्मिंग’मुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे महावीरांचा संदेश अंगीकारण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की , निसर्ग आपल्याला सर्व गोष्टींचे संतुलन शिकवतो. आपण निसर्गाविरूध्द जावून चालणार नाही. आपल्या स्वार्थासाठी कोणावरही अन्याय होवू नये हेच आदर्श विचार भगवान महावीर यांचे आहेत. ते विचार आपण आपल्या कृतीत आणूया. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा संदेश म्हणजे फक्त सजीवांना न मारणे इतक्यापुरता मर्यादित नसून अहिंसा ही विचारातून, शब्दातून आणि कृतीतून व्यक्त व्हावी असा आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या की, भारताला विकासाकडे नेण्यासाठी भगवान महावीरांच्या विचारांची गरज आहे. जैन समाजाने विकास करत असताना सामाजिक कार्याचा जपलेला वारसा यापुढेही जपावा, असे आवाहन त्यांनी केले.
जैन समाजाच्या वतीने ॲसिड हल्ल्यातील पीडितांच्या मदत आणि पुनर्वसनाकरिता 39 लाख रूपयांचा धनादेश यावेळी नयनपद्मसागर महाराज यांच्या हस्ते अमृता देवेंद्र फडणवीस चालवत असलेल्या ट्रस्टकरिता मदत म्हणून यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमात भगवान महावीर यांच्यावर आधारित संगीताचा देखील कार्यक्रम पार पडला.