मुंबई : पुरोगामीत्वाचे अध्वर्यू क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या ध्यासपर्वातील महाराष्ट्र घडविण्यासाठी, पर्यायाने राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी कटीबद्ध होऊ या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांना १९३ व्या जयंती निमित्त अभिवादन केले.
वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, महात्मा फुले यांनी सत्यशोधक चळवळीतून आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या त्याग, समर्पणामुळेच राज्यात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी झाली. महात्मा जोतीराव हे बहुआय़ामी होते. त्यांनी शेतकरी, कष्टकरी तसेच वंचितांच्या उत्थानासाठी अपूर्व योगदान दिले. विचारवंत, लेखक, साहित्यीक, कवी याशिवाय उत्तम शेतकरी, उद्योजक, व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून महात्मा जोतीराव यांनी ठसा उमटविला. ब्रिटीश साम्राज्यालाही त्यांनी आव्हान दिले. त्यांना खडे बोल सुनावले.
दिडशे वर्षांपुर्वी महात्मा फुले यांनी आपल्या कामातून आधुनिक राष्ट्र उभारणीची दूरदृष्टी मुर्त स्वरुपात आणली. त्यातूनच त्यांनी त्या काळात पायाभूत सुविधा क्षेत्रातही आपला ठसा उमटविला. या कामातून मिळालेल्या धनाचा विनियोग त्यांनी सामाजिक कामांसाठी केला. त्यांच्या ध्यासपर्वातील राष्ट्र उभारणीत योगदान देणे, हेच आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.