मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचा शुभारंभ येत्या 2 ऑक्टोबरपासून होणार असून, या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी प्रभातफेरीचे आयोजन करणे, गांधी वंदना देणे, गांधीजींच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय गांधीजींच्या असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आंदोलन, भारत छोडो आंदोलन यावर निबंध स्पर्धा घेणे, सर्व शाळांमधून विज्ञान जत्रांचे-प्रदर्शनांचे आयोजन करणे, गांधीजींच्या विचारावर आधारीत चित्रकला स्पर्धा आयोजित करणे, गांधीजींचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करणे तसेच गांधीवादी विचारवंतांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित करणे. याबरोबरच या व्यतिरिक्तदेखील महात्मा गांधींचे विचार विद्यार्थी, पालक आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचतील या उद्देशाने विविध अभिनव कार्यक्रमांचे आयोजन शाळा स्तरावर करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.