मुंबई : राज्यातील 2 हजार 65 महसूल मंडळांपैकी 2 हजार 57 मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी पूर्ण झाली असून ते कार्यान्वित झाले आहेत.त्याद्वारे महसूल मंडळातील तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा याबाबत माहिती उपलब्ध होत आहे, अशी माहिती कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
विधानसभा सदस्य सर्वश्री विरेंद्र जगताप, हर्षवर्धन सपकाळ, अमित झनक, अमर काळे, रणजित कांबळे, प्रशांत ठाकूर, श्रीमती यशोमती ठाकूर, अमिता चव्हाण, मनिषा चौधरी आदींनी लेखी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात कृषी मंत्र्यांनी म्हटले आहे की, महावेध प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे काम सुरु आहे. 2 हजार 65 महसूल मंडळांपैकी 2 हजार 57 मंडळांमध्ये ही केंद्र सुरु करण्यात आली आहे. या केंद्रातून हवामान विषयक माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येते. या माहितीचा हवामान आधारीत फळपीक विमा योजना,प्रधानमंत्री पीक विमा योजना यासाठी उपयोग होत आहे.असेही ते म्हणाले.