मुंबई :आरोग्य, शिक्षण, उद्योग, आर्थिक या क्षेत्रांसह पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्रात अमर्याद संधी उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. युएस इंडिया बिझनेस कौन्सिल यांच्यावतीने आयोजित इंडिया आयडीयाज या ४३ व्या वार्षिक परिषदेतील उद्योजक शिष्टमंडळांच्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या शिष्टमंडळात युएस चेंबर ऑफ कॅामर्सचे सदस्य तसेच भारतातील विविध क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे उद्योजक प्रतिनिधी आदींचा समावेश होता. युएस इंडिया बिझनेस कौन्सिलच्या अध्यक्ष निशा बिस्वाल, यु.एस. चेंबर ऑफ कॅामर्सचे अध्यक्ष थॉमस डोनेह्यू यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तभ धवसे आदींची उपस्थिती होती.यावेळी झालेल्या चर्चेत अँक्सेच्युरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा मेनन, निशिथ देसाई, बायोकॅानच्या किरण मुझूमदार, अकिन गम्पचे प्रकाश मेहता, येस बँकेचे राना कपूर, अॅम्वेचे समीर बहल आदींनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई आणि नवी मुंबई परिसरात दळणवळणाच्या सुविधा अधिक भक्कम करण्यासाठी अनेकविध पायाभूत सुविधाच्या विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हा रेल्वे मार्गाचा विकास, ट्रान्स हार्बर-लिंक, मेट्रोचे जाळे हे विकास प्रकल्प तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचे काम प्रगतीपथावर आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या सातशे किलोमीटर्सच्या प्रकल्पासाठीचे भूसंपादनही नियोजनबद्धपणे सुरु आहे. भूसंपादनाच्या नव्या नियमांमुळे शेतकऱ्यांना चांगला मोबादला देऊन या जमिनी प्रकल्पांसाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे जलसिंचनाचे प्रकल्पांनाही आता जमीन वेगाने संपादित करता येऊ लागली आहे.आयुष्यमान भारत या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात महात्मा फुले जन आरोग्य योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. ही योजना आणि केंद्र शासनाची आयुष्यमान योजनेची सांगड घातली जाणार आहे. आयुष्यमान योजनेमुळे ग्रामीण भागात आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार होणार आहे. शासकीय आणि खासगी क्षेत्राच्या सहभागामुळे जनतेपर्यंत आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीने पोहचविता येणार आहे.नवी-मुंबई आणि पुणे हा परिसर शिक्षण सुविधांच्या बाबतीत स्वयंपूर्णरित्या विकसित झाला आहे. या शिक्षण सुविधांना सहाय्यभूत ठरेल अशीच धोरणे राबविली जात आहेत. यामुळे नॅालेज-बेस्ड स्मार्ट सिटीजही विकसित होऊ लागल्याचेही, मुख्यमंत्र्यांनी सांगितले.बुलेट ट्रेन तसेच राज्यात येणाऱ्या उद्योगांना सुविधा पुरविणे तसेच वित्तीय क्षेत्रातील सुधारणांसाठी फिनटेक धोरण आखण्याच्याबाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याच्या मुद्यावरही चर्चा झाली.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडियाना प्रांताचे गर्व्हनर एरिक होलकंम्ब यांच्याशीही विविध विषयांवर चर्चा केली.