मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने 24 मार्च 2018 पासून सुरू केलेल्या ‘महाराष्ट्र शासन (Govt of Maharashtra)’ जिओ चॅट चॅनेलला अत्यंत कमी कालावधीत फॉलोअर्सने पसंती दर्शवली असून या चॅनेलने एक लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे.
‘महाराष्ट्र शासन’ हे जिओ चॅट या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. या ॲपवर मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांची नावे, संपर्क क्रमांक, नोकरी विषयक माहिती, ‘आपले सरकार’ ॲप, तक्रार नोंदणी, महालाभार्थी तपशील, रोजचे हवामान याबरोबरच महाराष्ट्र विषयक सामान्यज्ञान आदी माहिती ग्रॉफिक्स स्वरूपात देण्यात येते.‘प्रश्नमंजुषा’ या प्रश्नोत्तरांवर आधारित उपक्रमाला फॉलोअर्सनी विशेष पसंती दिलेली असून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या पहिल्या विजेत्यास महासंचालनालयाकडून ‘लोकराज्य’ या मासिकाचे अंक वर्षभर विनामूल्य देण्यात येत आहेत.‘जिओ चॅट’ हे मोबाईल ॲप गुगल प्लेवर सर्व मोबाईल धारकांसाठी मोफत उपलब्ध असून या ॲपमधील ‘महाराष्ट्र शासन (Govt of Maharashtra)’ यास सबस्क्राईब करून शासकीय योजनांची तसेच अन्य उपक्रमांबाबतची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.