मुंबई : महाराष्ट्रातील वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे असे म्हटले जात असले तरी वास्तवात वाघांची संख्या घटत नसून वाढत आहे, सध्या महाराष्ट्रात एकूण ३०३ वाघांची संख्या असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. यापैकी २०३ वाघ असून १०० बछडे आहेत. राज्यात वाघांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघिणींचा मृत्यूसंदर्भात प्रश्न सदस्य जयंत पाटील, अनिल तटकरे यांनी विचारला. मुनगंटीवार म्हणाले की, पेंच व्याघ्र प्रकल्पात जानेवारी २०१७ मध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती. त्या वाघिणीचा मृत्यू हा रेसिपेटरी फेल्युअरमुळे असू शकतो, असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले होते. तथापि, यासंदर्भात पुढील तपासणीसाठी या वाघिणीचा विसेरा व घटनास्थळाजवळील पाणवठ्यातील पाण्याचे नमुने न्यायसहायक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तसेच फेब्रुवारी २०१७ मध्ये एक वाघ मृतावस्थेत आढळला होता. दोन वाघांच्या झुंजीत झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे सदर वाघांचा मृत्यू झाला आहे.