मुंबई : महाराष्ट्राकडून केरळमधील आपद्ग्रस्तांसाठी सुमारे 6.5 टन मदतसामग्री काल सायंकाळी जहाजातून रवाना करण्यात आल्यानंतर आज राज्य सरकारतर्फे आणखी 30 टन मदतसामग्री पाठविण्यात आली. या मदतीसह भारतीय वायुदलाच्या विमानाने आज दुपारी चारला मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतले. याशिवाय, आणखी 5 टन मदतसामग्री उद्या सकाळी पाठविण्यात येणार आहे.
केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा पुढाकार घेतला असून, आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मदत पाठविण्यात आली आहे. त्यात अन्न पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट, बेडशीट्स, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादींचा समावेश असून, केरळ सरकारने मागितलेल्या निकडीच्या बाबी यात प्राधान्याने पाठविण्यात येत आहेत.
केरळमध्ये पुराची स्थिती गंभीर झाल्याने आणि तेथील नागरिकांना तत्काळ मदतीची गरज लक्षात घेता, राज्य सरकारने अनेक पाऊले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून 20 कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा आधीच केली आहे. त्यांच्याच निर्देशानुसार, याबाबतच्या मदतकार्यासाठी एक नियंत्रण कक्ष मंत्रालयात 24 X7 कार्यान्वित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या व्यतिरिक्त एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेलफेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्था, संघटना या कामात सक्रीय योगदान देत आहेत. राज्य सरकार सातत्याने केरळ सरकारमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, निकडीच्या बाबी प्राधान्याने पाठविल्या जात आहेत. काल राज्य सरकारच्यावतीने 6.5 टन सामग्री रवाना करण्यात आली होती. याशिवाय, राज्यभरातील विविध सामाजिक संघटनांनी गोळा केलेली 40 टन सामग्रीही पाठविण्यात आली आहे.
काल जहाजातून रवाना करण्यात आलेल्या मदतीत हेलिकॉप्टरमधून टाकता येतील, अशा पद्धतीने वॉटरप्रूफ पॅकिंग केलेल्या 15 हजार फुड पॅकेट्सचा समावेश होता. राज्य सरकारकडून मदत व पुनर्वसन विभाग, वन विभाग, बृहन्मुंबई महापालिका, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, अन्न व नागरी पुरवठा, राजशिष्टाचार इत्यादी विभाग या मदत कार्यात गुंतलेले आहेत. भारतीय हवाई दल, भारतीय नौदल, कोस्टगार्ड इत्यादींच्या सहकार्याने हे काम पूर्ण केले जात आहे.