
मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र श्रमिक सभा या कामगार संघटनेच्या पुढाकाराने रिक्षा चालकांची स्वतंत्र युनियन स्थापन करण्यात येत असून अंधेरी पश्चिम येथील रिक्षा चालक जावेद पठाण हे संघटनेचे अध्यक्ष आहेत. तर भांडुपचे धुंडिराज थोटे यांची उपाध्यक्षपदी व अजय रणदिवे यांचे सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे.
रिक्षा चालकांचे अनेक प्रश्न असून हातावर पोट असल्यासारखे त्यांची स्थिती आहे. चालक आजारी असल्याने रिक्षा चालवू न शकल्यास संपूर्ण कुटुंबाची उपासमार होते. वृद्धापकाळातही रिक्षा चालकांचे हाल होतात. या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांसाठी माथाडी मंडळांच्या धर्तीवर स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे, या मागणीचा संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. मंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना आजारपणाच्या काळात मानधन मिळावे, वयोमानानुसार रिक्षा चालवणे अशक्य झाल्यानंतर ग्रॅच्युइटी, तसेच निवृत्तीवेतना सारखे लाभ मिळावे, आजारपणाच्या काळात कामगार रुग्णालयात उपचाराची सुविधा मिळावी, अशा मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालकांची अनेक वेळा पिळवणूक केली जाते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी फोटो काढून त्यांना दंड ठोठावला जातो. तसेच दंडाच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जाते. या विरोधातही संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येणार आहे.

आज बससेवा अपुरी असल्यामुळे उपनगरातील रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी मुख्यतः रिक्षावर अवलंबून असतात. त्यामुळे सर्व रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा स्टँड सुरू करावेत, अशीही मागणी करण्यात येणार आहे.














