मुंबई : ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या (एनएसडी) धर्तीवर चित्रनगरीमध्ये ‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. याबाबत पहिले पाऊल टाकत मुंबईत महाराष्ट्र ड्रामा स्कूल कसे असेल याबाबत राज्य शासनाने कार्यकारी समितीची स्थापना केली.
महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामामार्फत रंगभूमी विषयक नव्या संकल्पना आणि प्रयोगांना वाव मिळणे शक्य होणार आहे. मुळातच नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे रंगभूमीच्या विकासासाठी काम करीत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही रंगभूमीच्या सर्वांगीण विकासाला वाहिलेले संकुल असावे यादृष्टीने राज्य शासन प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाच्या माध्यमातून नाट्य, कलाप्रेमींना नाट्यकलेचे शिक्षण घेत नाट्यकलेशी जवळीक साधता येणार आहे. केवळ राज्यातीलच नव्हे तर विदेशातीलही नाट्यप्रेमींना या स्कूलमध्ये शिक्षण घेता येईल अशी या स्कूलची रचना असणार आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नाट्य कला आघाडीवर आहे. दिल्लीत असलेल्या एनएसडीमध्ये देशभरातील कलाकार शिकण्यासाठी येतात. त्यामुळे प्रचंड स्पर्धा असते. महाराष्ट्रातील एक किंवा दोन व्यक्तींची निवड तेथील अभ्यासक्रमांसाठी होते. महाराष्ट्रात स्कूल ऑफ ड्रामा सुरू झाले तर मराठी कलाकारांना मोठया प्रमाणात शिकवण्याची संधी मिळेल. शिवाय, एनएसडीच्या अभ्यासक्रमासोबतच मराठी लोककला व लोकनाट्याचा अभ्यास करायला मिळणार आहे.
पु.ल.देशपांडे कला अकादमी येथे नाट्यक्षेत्राशी संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम
केंद्र शासनाच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाच्या स्थापनेचा पूर्वतयारीचा एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर प्रथमत: नाट्यक्षेत्राशी निगडीत असे चार वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course) सुरु करण्यात येत आहेत. नाट्यक्षेत्राशी संबंधित चार प्रमाणपत्र अभ्यासक्रम पु.ल.देशपांडे कला अकादमी येथे सुरु करण्यात येतील.
कार्यकारी समितीची स्थापना
याशिवाय महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा कसे असेल यासाठी एका अभ्यासगटाचीही स्थापना करण्यात आली आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक हे कार्यकारी समितीचे अध्यक्ष असतील तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य असतील. याबरोरबरच मुंबई विदयापीठाचे अमोल देशमुख, अभिराम भडकमकर आणि दिपक करंजीकर हे अशासकीय सदस्य असतील. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे या कार्यकारी समितीमध्ये सदस्य सचिव असतील. सदर समिती येत्या सहा महिन्यात प्रस्तावित महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामामध्ये विविध अभ्यासक्रम, शिकविण्यात येणारे विषय, शिकविण्याची कार्यपध्दती याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करणार आहे.