मुंबई : शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या मुलांना शिक्षणाची पुन्हा संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या मंडळाकडून बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी पाचवी, आठवी, दहावी व इयत्ता १२ वी या वर्गासाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. यापूर्वी १० व १२ वी परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनाही मुक्त विद्यालयाचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील अंदाजे पाच लाख मुलांची शिक्षणातून होणारी गळती थांबविण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रयत्न होणार आहेत.
राज्य मंडळाकडून गेली कित्येक वर्षे बहिस्थ्ा विद्यार्थी योजना म्हणजेच खाजगी विद्यार्थी थेट परीक्षा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत १७ क्रमांकाचा फॉर्म भरुन बाहेरील मुले १० वी परीक्षेस दाखल होतात. हे प्रमाण प्रतीवर्षी जवळपास एक ते दीड लाख विद्यार्थी इतके आहे. मात्र, विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण या योजनेत जास्त आहे. त्याचे कारण म्हणजे नियमित विद्यार्थ्यांसाठी जे विषय,अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके आहेत तीच बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येतात.
औपचारिक शिक्षणाला पूरक आणि समांतर अशी शिक्षण पद्धती सुरु करणे, शालेय शिक्षणातील गळती आणि नापासी कमी करणे, प्रौढ कामगार, प्रौढ आदिवासी, गिरिजन, गृहिणी या सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, जीवनाला उपयुक्त असे व्यवसायाभिमुख शिक्षण देणे, सुशिक्षित आणि जागरूक नागरिक बनविणे, स्थानिक स्तरावर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे ही उद्दिष्टे ठेवून मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी सोयीनुसार अध्ययन करू शकणार असून लवचिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे योग्य मुल्यांकन होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
या मंडळास इयत्ता पाचवी, आठवी, दहावी आणि बारावी या वर्गासाठी परीक्षा घेण्याचे अधिकार राहणार आहेत. हे मंडळ राज्य शिक्षण मंडळाचा भाग म्हणून कार्यरत असेल.
विविध टप्प्यांवर मुक्त विद्यालयासाठी प्रवेश पात्रता निश्चित करण्यात आली आहे. पाचव्या इयत्तेसाठी (अथवा समकक्ष) परीक्षा द्यायची असल्यास त्या शैक्षणिक वर्षाच्या १ जुलै रोजी उमेदवाराचे किमान वय १० वर्षे असणे गरजेचे आहे. आठव्या इयत्तेसाठी (अथवा समकक्ष) परीक्षा द्यायची असल्यास उमेदवाराचे किमान वय १२ वर्षे असणे गरजेचे आहे. १० वी साठी (अथवा समकक्ष) परीक्षा द्यायची असल्यास उमेदवाराचे किमान वय १४ वर्षे असणे गरजेचे आहे. आणि १२ साठी साठी (अथवा समकक्ष) परीक्षा द्यायची असल्यास उमेदवाराचे किमान वय १६ वर्षे असणे गरजेचे आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वयाचा अथवा वयाबाबत वैद्यकीय दाखला सादर करावा लागेल. तसेच किमान लेखन-वाचन कौशल्य व अंकज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. यापूर्वी हा विद्यार्थी औपचारिक शाळेत गेला असल्यास ती सोडल्याचा दाखला अथवा प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
१० वी समकक्ष परीक्षेसाठी विद्यार्थी किमान दोन वर्षे महाराष्ट्राचा रहिवाशी असावा लागेल. या परीक्षेसाठी संबंधित विद्यार्थी औपचारिक शाळेत कधीही गेलेला नसल्यास त्यास प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. १२ वी समकक्ष परीक्षेस इच्छूक विद्यार्थी कोणत्याही मान्यता प्राप्त मंडळाची १० वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
मार्च आणि एप्रिल मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी १ मे ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करता येईल तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी १ नोव्हेंबर ते ३० एप्रिल या कालावधीत नाव नोंदणी करता येईल. एकदा केलेली नोंदणी पाच वर्षासाठी वैध राहणार असून या नोंदणीद्वारे सलग पाच वर्षे किंवा सलग ९ परीक्षांची संधी उमेदवारास दिली जाणार आहे.
मुक्त विद्यालय मंडळात विविध स्तरावर विषय निश्चित करण्यात आले आहेत. या विषयांसाठी स्वतंत्र अभ्यास मंडळे तसेच स्वयं अध्ययन साहित्य निर्माण करण्यात येणार आहे. या संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्यात विविध शासकीय विभागांच्या प्रतिनिधीसह मुक्त शिक्षण क्षेत्रातील पाच तज्ज्ञही समाविष्ट असतील.