मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आज पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे, सहाय्यक सचिव (तांत्रिक) पुंडलिक मिराशे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले की, मागील एक ते दीड वर्ष आपण कोरोनाचा सामना करत असतानाही माझी वसुंधरा अभियान, कांदळवनांचे संरक्षण, जंगलांची वाढ यासाठी काम करत आहोत. महाराष्ट्र हा पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत जगाला मार्ग दाखवू शकतो. यामध्ये सोशल मीडिया हे महत्त्वाचे tool राहणार आहे. समाजमाध्यमे ही वर्तमानातील आरसा असून आपल्या कामाचे प्रतिबिंब त्यात दिसून येत असते. म्हणून या माध्यमातून जास्तीत जास्त लोकसंवाद साधणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, जगभरात कोणतीही घडलेली घटना क्षणभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पहोचते. म्हणून डिजिटल मीडिया खूप महत्त्वाचे माध्यम झाले आहे. आता प्रदूषण नियंत्रण मंडळ सोशल मीडियावर आल्याने पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणविषयक माहिती आणि जनजागृतीसाठी त्याचा व्यापक उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ट्विटर हॅन्डल आणि Instagram हे @mpcb_official तर फेसबूक MAHARASHTRA POLLUTION CONTROL BOARD या नावाने कार्यरत झाले आहे.