![](http://www.konkanvruttaseva.com/wp-content/uploads/2018/01/Hon-CM-at-Moti-Bindu-Mukta-Maharastra-Prog-3-300x200.jpg)
मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानात संबोधित करताना मुख्यमंत्री
मुंबई : महाराष्ट्र मोतिबिंदू मुक्त करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत सुमारे १७ लाख रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन महाराष्ट्र मोतिबिंदू मुक्त करण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मरीन लाईन्स येथील ग्रॅंड वैद्यकीय महाविद्यालयात मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार रणधिर सावरकर यावेळी उपस्थित होते. या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉ.रागीणी पारेख, डॉ.अग्रवाल, किशोर मसुरकर यांचा प्रातीनिधिक सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाचे समन्वयक डॉ.तात्याराव लहाने यांनी प्रास्ताविक केले. अनुलोम संस्थेचे अतुल वझे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त् डॉ.संजीव कुमार आदी यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागातल्या गरीब माणसाला मोतिबिंदू झाल्यावर त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्याची देखील त्याची आर्थिक क्षमता नसते. जमेल त्या प्रमाणे तो आपले जीवन जगतो. मात्र मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून त्या माध्यमातून तळागाळातील ग्रामीण जनतेला दृष्टी देण्याच महत्वपूर्ण काम हाती घेण्यात येत आहे. मोतिबिंदू विरुद्ध सुरु केलेला हा सामना आपण नक्कीच जिंकू अशी ग्वाही देत हा सामना मात्र कसोटी नसून ट्वेंटी ट्वेंटीचा आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, काही कामांमध्ये ईश्वरीय आनंद मिळतो. ज्या लोकांचे मोतिबिंदूमुळे दृष्टी गेली आहे त्यांना नव्याने दृष्टी देण्याचे काम राज्यातील नेत्रचिकीत्सक अधिकारी व शल्य चिकीत्सकाकडून केले जात आहे. हे ईश्वरीय काम असल्याचे गौरवपूर्ण उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत राज्यातील सुमारे १७ लाख जणांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. जी टिम हे काम करीत आहेत त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात इतिहास घडविला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या मोहिमेत स्वत:ला झोकून देत मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र संकल्प यशस्वी करुया असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. सावंत यांनी पालघर कुपोषणाविरुद्ध लढा देत कुपोषण नियंत्रणात गुणात्मक बदल आणला आहे. तर राज्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन करुन गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविण्याचा मान वैद्यकीय शिक्षण मंत्री मिळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मधुमेहाविरुद्ध अभियान हाती घेणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री
या उपक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील गरीब माणसाला वैद्यकीय मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या ३ वर्षात राज्यभरात विविध ठिकाणी वैद्यकीय शिबीरांच्या माध्यमातून लाखो रुग्णांची तपासणी आणि शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. आता मधुमेहाविरुद्ध अभियान हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयातील रिकामे बेड
उपलब्ध करुन देणार-आरोग्यमंत्री
मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र संकल्पना राबविताना शस्त्रक्रीयेनंतर दुसऱ्या दिवशीचा तपासणीचा फॉलोअप महत्वाचा आहे. या शस्त्रक्रीयेनंतर होणारा जंतू संसर्ग रोखण्याकरिता नेत्रचिकीत्सा अधिकाऱ्यांनी रुग्णांना प्रशिक्षित केले पाहिजे. जिल्हा रुग्णालयांमध्ये जे बेड रिकामे असतील त्याचा वापर मोतिबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी करता येईल. त्यासाठी आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. या रुग्णांना बेड उपलब्ध करुन देतानाच त्यांना भोजन देखील दिले जाईल. राज्यातील खासगी नेत्र चिकित्सकांनी दरवर्षी ५० शस्त्रक्रिया मोफत कराव्यात, असे आवाहन करीत रीट्रोरेटीनाच्या शस्त्रक्रिया आपल्या खासगी रुग्णालयात मोफत करु, असे डॉ.सावंत यांनी यावेळी जाहीर केले.
मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाविषयी…
राज्यात १.४ टक्के अंधत्वाचे प्रमाण असून मोतीबिंदूमुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण ६२ टक्के आहे. मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानात राज्यातील ५० वर्षांवरील सर्व लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. ६०० नेत्र चिकित्सकांच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन तपासणी केली जाणार आहे. आरोग्य विभागाचे ८० तर वैद्यकीय शिक्षण विभागाचे १९ आणि खासगी डॉक्टरांचे ३० शस्त्रक्रिया गृहांच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेसाठी स्टीकर तयार करण्यात आले असून शस्त्रक्रिया केलेल्यांच्या घरावर ते लावले जाणार आहे. यामुळे या रुग्णांना मोफत चष्मा वाटप आणि तपासणी करणे सुलभ होणार आहे. १ डिसेंबर २०१७ पासून २० जानेवारी पर्यंत १ लाख २८ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.