रत्नागिरी, (आरकेजी) : मराठा क्रांती मोर्चाकडून आज पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’चे पडसाद चिपळूण तालुक्यातातील सावर्डेत पाहायला मिळाले. सावर्डे या ठिकाणी मराठा कार्यकर्त्यानी एक मराठा लाख मराठा घोषणा देत काही वेळ मुंबई गोवा महामार्ग रोखला तसेच सावर्डे बाजार पेठेतील दुकाने, खासगी वाहतूक बंद करण्यात आली.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरु असताना एका आंदोलकाचा काल गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान नदीत पडून मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषीत करावं, काकासाहेबांच्या कुटुंबियांना 50 लाखांची भरपाई द्यावी तसेच हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत मेगाभरती रोखावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
सावर्डे या ठिकाणी सकाळी 11 च्या सुमारास मुंबई गोवा महामार्ग रोखण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जवळपास 10 मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच व्यापारी दुकाने बंद आणि खासगी वाहतूक बंद करण्यात आली.