मुंबई – लखिमपूर खीरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापा-यांनीही बंदला पाठिंबा दिल्याने दुकाने व इतर व्यवहार बंद होते. बेस्ट वाहतूकही पूर्णपणे बंद होती. आठ ठिकाणी बेस्टची तोडफोड झाली. रिक्षा, टॅक्सी तुरळक प्रमाणात धावल्या. बेस्ट बंद राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले.
लखिमपूर येथे आंदोलनकर्त्या शेतकर्यांना गाडीखाली चिरडण्यात आले. या घटनेचा निषेध आणि शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने सोमवारी राज्यव्यापी बंद पुकारला होता. सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली. मुंबईच्या डबेवाल्यांनीही महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. गजबजलेल्या ठिकाणी शुकशुकाट होता. हॉटेल्स बंद होती.
शिवसेना भवन परिसर, वरळी, लालबाग, चेंबूर आदी ठिकाणी शिवसेना रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केले. वरळीत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याही ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या. राजभवन येथे काँग्रेसने मूक आंदोलन करून लखीमपूर घटनेचा निषेध नोंदवला.
महाराष्ट्र बंदमध्ये बेस्ट कामगार संघटना उतरल्याने मुंबईत बेस्ट वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड झाली.
ब














