रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात महापुराने अक्षरशः हाहाकार माजवला. दरम्यान जिल्ह्यात महापुरात जवळपास नऊशे ते एक हजार कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी दिली आहे.याबाबत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, महसूल विभागाकडून महापुरात बाधित झालेल्यांचे 100 टक्के पंचनामे पुर्ण झाले आहेत. यात चिपळूणात सर्वाधिक नुकसान आहे. चिपळूणातील ९ हजार २७३ कुटुंबांचं मोठं नुकसान झालं आहे. तर चिपळूणातील ४ हजार ३५९ दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. तर जवळपास ५ हजार गाड्यांचं नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. दरम्यान महापुरामुळे जिल्ह्यातील १० हजार ५७३ कुटुंबांचं नुकसान झालं असून सानुग्रह अनुदानासाठी एवढी कुटुंब पात्र असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या महापुरात चिपळूणमध्ये ४० घरं पूर्णतः पडली आहेत. तसेच ११९८ घरं अंशतः बाधित झाली आहेत. तर जिल्ह्यात एकूण २८१४ घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. आणि १०६ घरं पूर्णतः बाधित झाली आहेत.
चिपळूण आणि खेडमध्ये या नुकसानीचा आकडा जास्त आहे. तर भुस्खलन आणि पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील ४० जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्ये खेड आणि चिपळूणमधील ३२ व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी दिली आहे.














