मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या पुढे गाफील राहून चालणार नाही, हे सेनानेतृत्वाच्या लक्षात आल्याने निकालानंतर दुसऱ्याच दिवशी ३ विजयी अपक्ष उमेदवारांना सेनेने गळाला लावले. बहुमतासाठी ११४ जागांची गरज आहे. सेनेचे ८४ नगरसेवक आणि ३ अपक्ष यामुळे आता संख्या ८७ वर पोहोचली आहे. सत्तास्थापनेसाठी सेनेला २७ नगरसेवक हवेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी दिंडोशी येथील अपक्ष तुलसीदास शिंदे, घाटकोपर मधील स्नेहल मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. घाटकोपरमध्ये शिवसेना उमेदवाराविरोधात माजी शिवसेना विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी बंडखोरी केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांनी अपक्ष म्हणून त्यांची वहिनी स्नेहल यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. सुधीर मोरे यांनीही सेनेत प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी अनेक आमिषं दाखवली. दूत पाठविले. मात्र मी नम्रपणे नकार दिला. मी शिवसैनिक आहे,” अशी प्रतिक्रिया सुधीर मोरे यांनी दिली आहे.
आज संध्याकाळी अंधेरी (पश्चिम) मधील प्रभाग क्रमांक ६२ मधून निवडून आलेले अपक्ष उमेदवार चंगेज मुलतानी यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. चंगेज यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.