मुंबई : होळीच्या दुस-या दिवशी ‘धुलिवंदन’ हा सण सर्व जाती धर्माचे लोक साजरा करतात. एकाच धाग्यात गुंफणारा हा सण असून नवचैतन्य निर्माण करणारा आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांनी आपल्याच राज्य बांधवाबद्दल एक सहृदयता आणि सामाजिक बांधिलकी म्हणून या दिवशी पाण्याचा गैरवापर टाळावा, असे जाहीर आवाहन नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे. तसेच ‘होळी’ सणासाठी झाडे अथवा झाडांच्या फांद्या तोडू नयेत असेही ते म्हणाले आहेत.
पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगाचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पाण्याचे व रंगाचे फुगे एकमेकांवर मारण्याचे टाळून होळी हा सण कोणतेही गालबोट न लागता आपापसात सलोख्याचे संबंध वृद्धिंगत करणारा म्हणून साजरा करावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ च्या तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास तोडण्यास कारणीभूत होणे हा कलम २१ अन्वये अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोड करणार्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी कमीत कमी 1 हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते. ‘होळी’ च्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये. सतर्क नागरिकांनी वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, महानगरपालिका अधिका-यांस व स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे, असे महापालिकेने कळविले आहे.