
मुंबई : महानगरपालिका मुंबईवासियांना विविध नागरी सेवा सुविधा दर्जेदारपणे पुरविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करित असते, मात्र त्या कामांचे प्रतिबिंब मुंबईकरांपर्यंत दिसण्यासाठी प्रसार माध्यमे /सोशल मिडिया ही प्रसारमाध्यमे महत्वपूर्ण भूमिका बजावितात म्हणून त्यांनी अशी सर्व नागरी सेवा सुविधांची कामे मुंबईकर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केले आहे.
‘ रेड एफएम’ ९३.५ ची प्रसिध्द आरजे मलिष्का व त्यांचे सहकारी तसेच मराठी सिने अभिनेते अजिंक्य देव यांनी वरळी येथील महापालिकेच्या लव्हग्रोव्ह पंपीग स्टेशनला तसेच महापालिका मुख्यालयातील आप्तकालीन नियत्रंण कक्षाला आज (दि. २० जून ) भेट देऊन महापालिका करित असलेल्या कामांची पाहणी केली.
याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. विजय सिंघल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) अश्विनी जोशी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए.एल. जऱहाड, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अशोककुमार तवाडिया, उप आयुक्त (घ.क.व्य.) अशोक खैरे, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) विनोद चिठोरे, प्रमुख अभियंता (प.ज.वा.) श्रीकांत कावळे, प्रमुख अभियंता (घ.क.व्य) यमगर सहाय्यक आयुक्त (जी/दक्षिण ) देवेंद्रकुमार जैन हे उपस्थित होते.
प्रसिध्द आरजे मलिष्का तसेच मराठी सिने अभिनेते अजिंक्य देव यांनी वरळी येथील महापालिकेच्या लव्हग्रोव्ह पंपीग स्टेशनला भेट देऊन तेथे पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी असलेल्या यंत्रणेची माहिती करुन घेतली.
महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी पावसाळयाच्या दिवसांत पाणी भरणाऱया ठिकाणी करण्यात येत असलेल्या विविध निचरा व्यवस्थेचीही माहिती दिली. त्यासोबतच पावसाळयाच्या दिवसांत पाणी उपसा करणाऱया सहा उदचंन केंद्रापैकी पाच उदंचन केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली असून उर्वरित एक केंद्रही या पावसाळयात सुरु केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासोबतच चमडावाडी नाल्यालगत असलेली अनधिकृत बांधकामे पूर्णपणे काढून टाकण्यात आल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे यावेळी पाणी भरणाऱया ठिकाणांची संख्या कमी राहणार असून यावर्षी रस्त्यांची कामे चांगली झाली असल्याने रस्त्यांवर सुध्दा कमी प्रमाणात खड्डे कमी पडतील असे सांगितले.
यावर्षी २०० कि.मी.लांबीचे रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगितले. महापालिकेच्या ७ तलांवामधून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येत असून सध्यस्थितीत तलावक्षेत्रात पाऊस नसल्याने जलसाठा जुलैअखेरपर्यंत पुरविण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.
मुंबईतील घनकचरा, रस्ते, आरोग्यविषयक सुविधा, पाणीपुरवठा, नाल्यांची सफाई या महत्वपूर्ण विषयांबाबत महापालिका प्रशासन अत्यंत निष्ठापूर्वक कामे करित असून प्रसारमाध्यमे, सोशल मिडिया यांनी ही कामे मुंबईकरांपर्यंत पोहचावीत असे आवाहनही महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केले आहे.
सुप्रसिध्द आरजे मलिष्का, सुप्रसिध्द सिने कलावंत अजिंक्य देव व इतर उपस्थितांनी महापालिका करित असलेल्या कार्याचा गौरव करुन आपत्कालीन नियत्रंण कक्षातील अद्ययावत माहिती केंद्र व कार्यवाही प्रणालीबाबत गौरवाद्गार काढले
















