नवी दिल्ली : केंद्रीय कोळसा व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य शासनाच्या महानिर्मिती या वीज कंपनीला नियमित कोळशाचा पुरवठा करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यामुळे महानिर्मितीपुढील ऊर्जा निर्मितीच्या अडचणी लवकरच दूर होतील, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.बावनकुळे यांनी महानिर्मितीला रेल्वेद्वारे व कोळसा मंत्रालयाद्वारे नियमित कोळसा पुरवठा व्हावा या मागणीसाठी रेल्वे भवनात पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान श्री. गोयल यांनी महानिर्मितीला कोळसा पुरवठा करण्यासाठी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्यांनी रेल्वे मंत्रालय व कोळसा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले. यावेळी महानिर्मितीसमोरील कोळशाच्या पुरवठ्यातील अडचणींबाबत कोळसा मंत्रालयाचे सचिव डॉ. इंद्रजित सिंह यांना बावनकुळे यांच्यासोबत बैठक करून अडचणी सोडविण्याच्या सूचना केल्या.यानुसार सायंकाळी शास्त्री भवन येथे कोळसा मंत्रालयाचे सचिव डॉ. इंद्रजित सिंह आणि कोल इंडियासह महत्त्वाच्या संस्थांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बावनकुळे यांनी बैठक केली. राज्याच्या खनिकर्म विभागाचे संचालक श्याम वर्धने, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत महानिर्मितीसमोर कोळशाअभावी वीज निर्मितीसाठी येत असलेल्या अडचणींवर चर्चा झाली. तसेच, केंद्राद्वारे महानिर्मितीला नियमित कोळसा पुरवठा करण्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.