
महालक्ष्मी मंदिर परिसराच्या ८० कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता दिल्याची घोषणा करताना मुख्यमंत्री
मुंबई : कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवस्थान मंदिर परिसराच्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली. विकास आराखड्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तीनही वाहनतळावर पार्किंगची अद्ययावत माहिती देणारे डिजिटल फलक उभारून स्मार्ट वाहनतळ उभारण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या शिखर समितीच्या बैठकीस महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडीक, राजेश क्षीरसागर, माजी मंत्री आमदार सतेज पाटील, महापौर स्वाती येवलुजे, मुख्य सचिव सुमित मलिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते.
बिंदू चौक वाहनतळ ते मंदिर परिसर या पादचारी मार्गावर इलेक्ट्रिकल वाहने वापरण्यात यावीत. तसेच भक्त निवासामध्ये सौर ऊर्जेचा वापर होण्यासाठी सोय करावी. तसेच मंदिर परिसरात प्लास्टिक मुक्तीसाठी विशेष यंत्रणा उभारण्यात यावी. जेणेकरून हा परिसर स्वच्छ राहिल. तसेच निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे तेथेच विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्यात यावी. विकास आराखड्यातील कामांवर सनियंत्रणासाठी पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महानगपालिका आयुक्त चौधरी यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. हा परिसर विकास आराखडा ८० कोटीं आहे. यामध्ये मंदिर परिसरात सुमारे साडेबाराशे भाविक क्षमतेचे दर्शन मंडप (८.७३ कोटी) उभारण्यात येणार असून त्यामध्ये शौचालय, पिण्याचे पाणी, पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था आदी असणार आहे. व्हिनस कॉर्नरजवळ ८५०० चौ.मी. क्षेत्रावर भक्त निवास (२१.४८ कोटी) उभारण्याचे प्रस्तावित असून यामध्ये १३८ खोल्या, १० सूट, १८ हॉल (डॉरमेटरी) असणार आहेत. तसेच २४० क्षमतेचे बहुमजली वाहनतळ (११.०३ कोटी), डायनिंग हॉल, समुदाय, दुकाने आदींचाही समावेश यामध्ये आहेत. बिंदु चौक (४.८९ कोटी) येथे ४८४१ चौ.मी बहुमजली वाहनतळ उभारण्यात येमार असून यामध्ये १७० चारचाकी व ३१५ दुचाकी पार्क करण्याची याची क्षमता आहे. तर सरस्वती थिएटर (७.०१ कोटी) येथे २२०० चौ.मी. क्षेत्राचे बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार असून यामध्ये १४० चारचाकी व १४५ दुचाकी क्षमता आहे. याशिवाय मंदिरा भोवताली पादचारी मार्ग व बिंदू चौक ते भवानी मंडपापर्यंत पादचारी मार्ग (२.६५ कोटी), शहरात दिशादर्शक फलक (०.०६ कोटी), शौचालय, पिण्याचे पाणी आदी सार्वजनिक सुविधा (१.८७कोटी), मंदिरच्या आसपास क्षेत्राचे सौंदर्यीकरण (०.९४ कोटी), आपत्ती व्यवस्थापन सुविधा (१.६० कोटी), सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी (१.३१ कोटी), सेवा वाहिनी स्थलांतर (२.९१ कोटी), आरोग्य सुविधा (५२ लाख) आदींचा विकास आराखड्यात समावेश आहे.