फोटो ओळ: दोषी ठरविण्यात आलेला बस चालक संताजी कैलास किरदत्त.
रत्नागिरी, (आरकेजी): खेड तालुक्यातील जगबुडी नदीवर मार्च २०१३ मध्ये खासगी आराम बसला झालेल्या अपघात प्रकरणी चालकाला १० वर्षांची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेडच्या अतिरिक्त सत्र न्य़ायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
१९ मार्च २०१३ रोजी गोव्याकडून मुंबईला जात असलेल्या एका खासगी आराम बसला मुंबई गोवा महामार्गावरील खेडमध्ये जगबुडी पुलावर भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघातात ३७ प्रवासी ठार झाले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला होता. ही बस गोव्यातील महाकाली ट्रॅव्हल्सची होती. ही बस मुंबईत बोरिवली येथे जात होती. त्यातील बहुतांश प्रवासी मुंबई आणि गोव्यातील होते. पहाटे जगबुडी नदीवरच्या पुलावरून ही आराम बस नदीच्या पात्रात कोसळली. नदी पात्रातल्या खडकांवर बसचा टपाकडचा भाग आदळल्याने बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातामध्ये ठार झालेल्या ३७ जणांमध्ये पाच रशियन पर्यटक होते. हा अपघात संताजी कैलास किरदत्त या चालकाच्या हलगर्जीमुळेच झाल्याचं स्पष्ट झाले आहे.
दरम्यान अपघातानंतर खेड पोलिसांनी बसचालक संताजी किरदत्त याला अटक केली होती. अखेर आज याबाबत निकाल देताना खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने किरदत्त याला १० वर्षांची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.