मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रीय समाज पक्षाची (रासप) मुंबईत ताकद शुन्य आहे, एका एका प्रभागात पक्षाला फक्त ५० ते ८० मते मिळतात, असे पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे दुग्ध विकास आणि पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर यांनी आज कबूल केले. तसेच पक्ष वाढविण्यासाठी तळगाळातील घटकांपर्यंत पोहचा, असे आवाहन त्यांनी केले.
अंधेरीतील शिम्फोॅनी हाॅलमध्ये शाहू महाराज जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात जानकर बोलत होते. वीर कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री अनुराधा गोरे, गुजरात प्रभारी यामीनी पंचाल, अशोक पंचाल, बाळासाहेब दौडतळे, आप्पासाहेब घोपरडे, लक्ष्मण कोकरे, आरती मेत्रे, उद्दय भरत, डाॅ.अभिजीत वेरूळ, प्रमोद बनसोडे, जयंती परमार आदी यावेळी उपस्थित होते. येथे रासपचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक पंचाल यांनी हा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दाजी मार्कंड यांनी केले.
मुंबई कार्यकारणीतील निष्र्कीय पदाधिकार्यांची लवकरच हाकलपट्टी करणार असल्याचे ते म्हणाले. काम करणार्या कार्यकर्त्यांना संधी देऊ असे ते म्हणाले. पक्षातील एकाही कार्यकर्त्यांनी कुणाच्या हिताची कामे घेवून मंत्रालयात येवू नये, आपला आणि पक्षाचा वेळ न घालविता पक्षात सतत कार्यरत राहून तळागाळातील लोकांचे काम करावे, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
तुमच्या मेहनतीवर मी मंत्री झालो नाही, तर माझ्या बुध्दीने मंत्री झालो आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांनी समाजासाठी खूप काही केले, परंतु तुम्ही काय करता? असा प्रश्नच त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला.
मिरा-भाईंदर पालिका निवडणूकीत सर्व जागांवर रासप उमेदवार उभे करणार आहे. आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश त्यांनी दिली.