
नवी मुंंबई : नवी मुंबई महासायक्लोथोन २०१९ मध्ये रविवारी सतीष कुमार यांनी पुरुषांच्या ४६ किलोमिटरची तर ॠतूजा सातपुते यांनी महिलांची २६ किलोमिटरची मुख्य स्पर्धा जिंकली.
सदृढ आरोग्यासाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करावा हा संदेश देण्यासाठी लोकनेते गणेश नाईक प्रस्तृत या इव्हेंटमध्ये राज्यभरातून तसेच कर्नाटक, गुजरात आदी परराज्यातून आलेल्या ५३६ व्यावसायिक सायकलपटूंनी भाग घेतला. तसेच स्वच्छ, हरित आणि आरोग्यमय नवी मुंबइचा संदेश देण्यासाठी एक हजारांपेक्षा अधिक नागरिक तसेच हौशी सायकलपटू सहभागी झाले होते.
वाशीतील अरेंजा कॉर्नर येथे लोकनेते नाईक यांनी या स्पर्धेचा शुभारंभ केला. वाशी ते बेलापूर अशी सायकल चालवून त्यांनी सहभागी स्पर्धकांचा उत्साह वाढविला. आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, महापौर जयवंत सुतार, सभागृहनेते रविंद्र इथापे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, जयंत हुददार, राष्ट्रवादीचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
बदलत्या जीवनशैलीत निरोगी राहण्यासाठी सायकल चालविणे आवश्यक आहे, हा संदेश जनमानसात पोहचविणे हा महासायक्लोथोन आयोजित करण्यामागचा उददेश होता असे नमूद करुन पालिकेच्या वतीने सायकल चालविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्टॅन्ड उभे करण्यात आले रेल्वे स्थानकाजवळील आणि इतर स्टॅन्डमधील सायकलींची संख्या वाढवित जाण्याची सुचना महापौर सुतार यांना केल्याचे लोकनेते नाईक म्हणाले. व्यावसायिक स्पर्धकांसोबतच स्थानिक सायकलपटूं मोठया संख्येने स्पर्धेत सहभागी झाले, अशी माहिती आमदार संदीप नाईक यांनी दिली. सायकल चालविल्याने इंधनाची बचत होतेच शिवाय आरोग्य तसेच पर्यावरणही उत्तम राहते, असे मत त्यांनी मांडले.
ऐरोली येथील माइर्ंड स्पेस तसेच वाशी येथील अरेंजा कॉर्नर या ठिकाणाहून महासायक्लोथोन स्पर्धाना प्रारंभ झाला तर बेलापूर येथील किल्ले गावठाण येथे समारोप झाला. विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक आणि चषक देवून गौरविण्यात आले. अघमार्शना मेडीया आणि एन्टरटेनमेंट एलएलपी आणि मुंबई उपनगर जिल्हा हौशी सायकल संघटना यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते तर नवी मुंबई महापालिका, नवी मुंबई वाहतुक पोलीस आणि महाराष्ट्र सायकल संघटना या संस्थांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेतील विजेते(प्रथम तीन)
४६ कि.मी. पुरुष- सतीश कुमार, श्रीधर नववर आणि सचिन शर्मा
२६ कि.मी.महिला- ॠतूजा सातपुते, सौम्या अंतापूरे आणि आशू शर्मा
१५ कि.मी. पुरुष- योगेश शर्मा, प्रकाश ओमकार आणि शिवाजी गुटे
१५ कि.मी.महिला- संध्या कोकाटे, चैताली आणि स्मिता खजाले















