एस. हुसेन झैदी आणि जेन बोर्गेस लिखित ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकात गुन्हेगारी जगतात असणारा स्त्रियांचा सक्रिय सहभाग समोर आला आहे. त्या गुन्हेगार का बनल्या?त्या मागे असणारी विशिष्ट परिस्थिती, त्यांनी माफियांमध्ये मिळवलेले स्थान याचा उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.
पुस्तकाच्या शीर्षकावरून आपण काय वाचणार आहोत त्याची वाचकांना कल्पना होते. पण ती ज्या अतिसूक्ष्मतेने लिहिली गेली आहे, ते वाचून खरा वाचक अवाक झाल्याशिवाय राहत नाही. नात्यांची गुंतागुंत, ओढ, कपट, निडरपणा, सूड घेण्यासाठी केलेले प्रयत्न, विश्वासघात यांनी हे पुस्तक भरले आहे. मानवी जीवनात झालेले खरे नाट्य लेखकाने उत्तमरित्या यात साकारले आहे. हे पुस्तक मूळ इंग्रजी भाषेतील आहे. त्याचा मराठी अनुवाद अतिशय सुलभपणे करण्यात आला आहे.
काही महिलांनी मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर राज्य केले. लोकं अजूनही यापासून अपरिचित आहेत. याच महिलांच्या जीवनाचा मागोवा पुस्तकात घेण्यात आला आहे. जेनाबाई दारुवाली, गंगुबाई, सपना दीदी, महालक्ष्मी पापामणी ही नावे त्यापैकीच एक. त्यांच्या कुप्रसिद्ध इतिहासाची बाजू लेखकाने समोर आणली आहे.
जेनबाई दारुवाली –
सन 1940 मध्ये रेशनिंग दुकानांवर मिळणारं धान्य हे मर्यादित होतं. रेशनकार्डधारकांना सुद्धा ते अपुऱ्या स्वरूपात मिळत होते. डाळी,गहू, धान्य अपुरं पडू लागल्याने गरजूंनी- वंचितांनी काळ्या बाजाराचा आधार घेतला. घाऊक धान्य-विक्रेते आणि काळ्या बाजारात जास्त किमतीला विकणारे यांच्यातील दलालीचे काम जेनाबाई करायची. गुन्हेगारी विश्वातली तिची ही छोटीशी झलक होती. दानाबाजार पासून सुरु झालेला हा प्रवास जेनाबाई ला ‘चावलवाली’ ते ‘दारुवाली’ आणि पुढे मस्तान-करीमलाला ची सल्लामसलतगार म्हणून नावारूपास घेऊन आला. पुढे पोलीस इन्फॉर्मेर ते दाऊद ची मावशी या आणि अशा अनेक भूमिकांत वावरणारी जेनाबाईविषयी वाचताना त्या काळातील तिच्या प्रभावी व्यक्तिमत्वाविषयी कुतुहूल वाटल्याशिवाय राहत नाही.
गंगुबाई –
गंगा हरजीवनदास काठेवाडी उर्फ गंगुबाई ही गुजरातच्या काठेवाडी गावची. घरातले वाडवडील वकिली आणि शिक्षण क्षेत्रातले. पण मग अशा काही घटना घडतात की
गंगा कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी म्हणून नावारूपाला येते. रेड-लाईट भागातील स्त्रियांसाठी गंगुबाईचे कार्य आणि त्यांच्या जीवन-संघर्षाचा ज्वलंत प्रश्न वाचकांना थेट भिडतात. कामाठीपुरा ते करीमलाला आणि राजकीय वर्तुळात वावरणारी गंगुबाई विषयी वाचताना आपल्याला कळते ती तिच्या जिद्दीची, स्वाभिमानाची कथा. जी अनेक घटनांच्या पदरातून उलगडत जाते.
सपना दीदी –
आपल्या नवऱ्याचा(मेहमूद कालिया चा) एन्काऊंटर मध्ये झालेला मृत्यू ही दाऊद ची पूर्वनियोजित योजना होती हे अश्रफ उर्फ सपना दीदी ने हेरलं. जिव्हारी बसलेला हा घाव अश्रफ ला कधीही न विसरता येण्यासारखा होता. अन्यायाची परिसीमा अश्रफला सूड शिकवून गेला.
यातूनच अश्रफच सपना दीदी होणं आणि तिच्या रूपाने प्रस्थापित माफियांविरुद्ध बंडाने अंडरवर्ल्डला एक नवा प्रतिस्पर्धी उभा राहिला. तिच्या या विलक्षण जिद्दीतूनच हुसेन उस्तारा आणि त्याच्या टोळीकरवी सपना दीदीचा प्रवास अंगावर शहारा आणतो.
महालक्ष्मी पापामणी-
ड्रुग्स च्या धंद्यात प्रस्थापित झालेली ज्योती रामलिंगम उर्फ अम्मा आणि महालक्ष्मी पापामणी विषयी वाचताना ड्रुग्स,नशा या काळ्या बाजाराची माहिती तर होतेच शिवाय त्यांचा जीवनपट समजून घेताना कळतं कि त्यांनी जोडलेल्या लोकांचा, घरातील लोकांचा त्यांच्या विषयीचा दृष्टिकोन कसा होता. अवैध धंद्यातून जोडलेल्या लोकांची मदत घेणे, त्यांना वेळप्रसंगी मदत पुरविणे आणि अजून लोकांना जोडणे, हे म्हणजे एक अदृश्य साखळी निर्माण करण्यासारखा आहे, याची सतत जाणीव होत राहते.
मोनिका बेदी-
मोनिका बेदी आणि अबू सालेम हे वर्तमानपत्र आणि बातम्यांमधून चर्चिलेलं नाव. इथे मोनिका बेदी तिच्या गुन्हेगारी विश्वातल्या कनेक्शनविषयी स्वतः कथन करते. सालेमकडून झालेली फसवणूक, तिने घेतलेले चुकीचे निर्णय याविषयी ती प्रामाणिकपणे आड-पडदा न ठेवता बोलते. तिच्या एकंदर अनुभवाविषयी वाचताना तिच्या सालेम प्रकरणाचा, तिच्या कोर्ट-कचेऱ्या, तिच्या चुकीच्या निर्णयांची तिला कशी मोठी किंमत मोजावी लागली हे वाचकांना विचार करायला प्रवृत्त करतं.
पुस्तकातील नंतरची प्रकरणे ही आशा गवळी, नीता नाईक, सुजाता निकाळजे, पद्मा पुजारे, मिसेस पॉल, रुबिना सय्यद, तरन्नुम खान, इत्यादिंवर बेतलेली आहेत. यातील काही नावे ही कुप्रसिद्ध गँगस्टर च्या पत्नींची आहेत. या महिलांचा त्यांच्या गँगस्टर नवऱ्याला मदत करताना गँगमध्ये असलेला सक्रिय सहभाग, त्यांचे निर्णय, पोलीस आणि प्रतिस्पर्धी टोळीतील त्यांचा वाढत जाणारा प्रभाव पुस्तकात मांडण्यात आला आहे.
यातील बाकीची नावे ही गॅंगस्टरच्या प्रेमप्रकरणातून पुढे आलेली आहेत. मोहक मदनिकांनी गॅंगस्टरच्या मदतीतून तर कधी बेटिंग, स्मगलिंग आणि अशा अनेक अवैध मार्गांचा अवलंब स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला. स्वतःच्या गरजा भागवून अधिक पैसे कमावण्याच्या नादात गुन्हयात त्या गोवल्या गेल्या आणि नामशेष झाल्या.
मायावी मुंबापुरीत कामाठीपुरा, डोंगरी, र-रोड, शिव, कोळीवाडा, भायखळा, सोनापूर या आणि अशा अनेक गल्ल्या- रस्त्यांवर माफिया क्वीन्स ने आपली गुन्हेगारी साम्र्याज्याची सीमा; भाई आणि दादा लोकांच्या खांद्याला खांदा लावून वाढवलेली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस कडून प्रकाशित या पुस्तकाचा अनुवाद उल्का राऊत केला आहे. झैदी यांच्या लिखाणाला राऊत यांनी पुरेपूर न्याय दिला आहे. म्हणूनच पुस्तक वाचताना मुंबईच्या माफिया क्वीन्सचा काळ डोळ्यासमोर तरळत राहतो.
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पाने – 206
अनुवाद : राऊत उल्का
मूळ लेखक : झैदी हुसेन एस.