मुंबई : तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचे दिर्घ आजाराने आज निधन झाले. ८५ वर्षीय तोरडमल मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एशियन हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. उद्या ३ जुलैला सकाळी १० ते १०.३० दरम्यान माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ठेवण्यात त्यांचे पार्थीव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
तोरडमल यांची कारकिर्द अष्टपैलू राहिली. नाटक असो वा चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. इतकेच नव्हे तर निर्माता, दिग्दर्शक, लेखक म्हणूनही यश मिळवले. सिंहासन, बाळा गाऊ कशी अंगाई, आपली माणसे अशा अनेक मराठी चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत.
‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन तोरडमल यांनी केले. या नाटकाचे सुमारे ५०००हून अधिक प्रयोग झाले. या नाटकात प्राध्यापक बारटक्के ही त्यांनी केलेली भूमिका विशेष गाजली होती.