मुंबई, 15 June : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दै. ‘सामना’ च्या संपादक रश्मी ठाकरे यांचे वडील माधवराव गोविंद पाटणकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. अंधेरी येथील क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
माधवराव पाटणकर यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांना त्यांना क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
माधवराव हे प्रख्यात ज्येष्ठ उद्योजक होते. अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. प्रबोधन प्रकाशनचे ते सन्माननीय विश्वस्त होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात आज शिवाजी पार्क स्मशानभूमीत माधवराव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, परिवहनमंत्री अनिल परब, आमदार सदा सरवणकर, एटीएस प्रमुख देवेन भारती, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिष कुमार सिंग, सहाय्यक आयुक्त चवरे, सतीश सरदेसाई, श्रीधर पाटणकर, मयूर नागले, दिलीप श्रुंगारपुरे, तन्मय श्रुंगारपुरे, मंगेश नागले, श्रीरंग ओक, वरुण सरदेसाई, शौनक पाटणकर, दिलीप प्रधान, चेतन प्रधान, पुण्यशाली पारेख, आदित्य झवेरी, संजय सावंत आदी उपस्थित होते.
माधवराव पाटणकर यांच्या निधनाने वृत्त समजताच अनेक सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नियोजित बैठका रद्द केल्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे आदींनीही शोक व्यक्त केला आहे.