मुंबई: बेस्टच्या वडाळा आगारात दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नोटांची उधळण करत नृत्य केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री माधवी जुवेकर हिच्यासह ७ कर्मचार्यांना बेस्ट प्रशासनाने सेवेतून बडतर्फ केले. या कारवाईमुळे बेस्ट उपक्रमात एकच खळबळ उडाली आहे.
बेस्ट उपक्रम अडचणीत आला असून,बेस्टची अवस्था दिवसेंदिवस खालावत आहे. अशातच ८ नोव्हेंबर २०१७ मध्ये वडाळा आगार येथे दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बेस्टची कर्मचारी असलेल्या माधवी जुवेकर हिच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी तेथे नृत्य केले.यावेळी त्यांनी माधवी जुवेकर हिच्यावर नोटांची उधळण केली .माधवी जुवेकर हिनेही तोंडात नोटा घेऊन ओंगाळवणे नृत्य केले .यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. यावरून बेस्टवर टिकेचे झोड उडाली.
याची गंभीर दखल घेत तत्कालीन बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी चौकशीचे आदेश दिले.चौकशी समितीने याचा अहवाल गेल्या आठवड्यात महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांना सादर केला. यारकरणी जुवेकर हिच्यासह ७ जणांवर ठपका ठेवून आज त्यांना बेस्ट प्रशासनाने सेवेतून बडतर्फ केले .तर अन्य ५ जणांची पदोन्नती रोखण्याची शिफारस करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, याप्रकरणी जुवेकर यांच्यासह सदर कर्मचाऱ्यांना समज देता आली असती. बडतर्फ ही मोठी शिक्षा आहे,असे मत विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी व्यक्त केले.
तर आपण चुकीचे समर्थन करत नाही परंतु शिक्षा कमी झाली पाहिजे, हे सातही जण मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ही शिक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे बेस्टच्या ठरलेल्या प्रक्रियेनुसार ही शिक्षा कमी करण्याचे निर्देश आपण प्रशासनाला दिले आहेत असे, बेस्ट समिती अध्यक्ष
आशिष चेंबूरकर यांनी सांगितले.