मुंबई, 6 जून, (निसार अली) : मढ़ कोळीवाडा-लोचर गाव व पातवाडी गावातील मच्छिमारांच्या घरांचे वादळी वार्यामुळे छत उडून नुकसान झाले. आज 6 जून रोजी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. निसर्ग चक्रीवादळानंतर आलेला पाऊस आणि वाहणारे जोरदार वारे याचा फटका मढ गावाला बसला. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची मागणी स्थानिक कोळी नेते डॉ. नेक्सन नाटके आणि संतोष कोळी यांनी परिसराची पाहणी करून मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांना पत्र लिहून केली आहे.
मच्छिमारांसाठी सन 2019-20 हे संपूर्ण वर्ष नुकसानीचे ठरले आहे. सुरूवातीच्या मासेमारी हंगामात मोठे नुकसान झाले. अवकाळी पाऊस वादळी वारे नंतर थंडीच्या काळात या अत्यल्प मासेमारी नंतर शेवटचा हंगाम मिळेल म्हणून आशेत असताना कोरोना आजाराच्या प्रादुर्भावाने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व मासळी मार्केट बंद झाल्याने मच्छीमारांवर उपासमारीची पाळी आली. त्यातच आज 6 जुन 2020 शनिवार रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास सोसाट्याचा वारा व पाऊस सुरू झाला. त्यामुळे मढ कोळीवाडा, लोचरगाव व पातवाडी विभागातील बऱ्याच मच्छिमारांचे नुकसान झाले आहे.
कैलाश लक्ष्मण भोईर लोचरगाव, मढ, नारायण भास्कर बाजे लोचरगाव, मढ , लक्ष्मण सखाराम कोळी लोचरगाव, मढ, गजानन चैत्या बाजे लोचरगाव, मढ , मानकुबाई मंगळ्या कोळी लोचरगाव, मढ , सुनील त्रिंबक कोळी पातवाङी गाव, मढ, प्रशांत भास्कर कोळी नवानगर,मढ कोळीवाडा, देवचंद्र हरिश्चंद्र कोळी लोचरगाव, मढ यांचे नुकसान झाले आहे. तसेच मढ वांजरे गल्ली आणि लोचर येथील जाळी विणण्याचे शेडचे पत्रे उडाले आहेत. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची मागणी स्थानिक कोळी नेते डॉ. नेक्सन नाटके आणि संतोष कोळी यांनी परिसराची पाहणी करून मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांना पत्र लिहून केली आहे.