मुंबई, (निसार अली) : पारंपरिक मच्छीमारांचा व्यवसाय धोक्यात आणणार्या पर्सीनेट आणि लाईट मासेमारीवर राज्यसरकारने बंदी घालावी, अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार संघटनेने केली आहे. बंदी नाही घातल्यास मच्छीमार संघटना कुटुंबीयांसोबत पावसाळी अधिवेशनात आमरण उपोषण करले, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष महेश तांडेल यांनी दिला आहे.
पावसाळी अधिवेशनात आमरण उपोषण करण्याबाबत पुर्वतयारी म्हणून संघटनेने कोकण किनारपट्टीवर मासेमारांच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकांना मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पर्सिनेटमुळे कोकण किनारपट्टीवरील पारंपरीक मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. या मासेमारीमूळे समुद्रात असलेली माशांची हजारो टन लहान पिल्ले मारली जातात. परिणामी, समुद्रात माशांचे प्रमाण कमी होत चालले आहे. कोकण किनारपट्टीवर मासेमारीचा दुष्काळ पडत चालला आहे. पर्सीनेटद्वारे मासेमारीवर बंदी न घातल्यास मच्छीमार उद्ध्वस्त होतील. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.