मुंबई, (निसार अली): मालवणीतील कच्चा रोड येथील एलिया उर्दू हायस्कूल या शाळेच्या व्यवस्थापनाने उर्दू माध्यमातील प्रवेश बंद करत आहोत, असा फलक लावल्याने पालक वर्गात संभ्रम पसरला आहे. व्यवस्थापनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आपल्या पाल्याला उर्दू माध्यमात शिकविण्यासाठी इच्छूक असलेल्या पालकासमोर आता कोठे जावे? असा प्रश्न पडला आहे. या शाळेत सध्या ४३७ विद्यार्थी उर्दू माध्यमात शिक्षण घेत आहेत.
शाळेच्या इमारतीत इंग्रजी शाळा सुरु आहे. मालवणीत मुस्लिम बहुसंख्य असल्याने पाल्याने उर्दू शाळेत शिकावे, याकडे पालकांचा कौल आहे. असे असताना, एलिया या अनुदानित शाळेच्या प्रशासनाने उर्दू भाषेत फलक लावून नवीन प्रवेश घेतले जाणार नाही, असे लिहिले आहे. याबाबतचे स्पष्टीकरणही शाळेने दिलेली नाही.
मुख्याधापिकेशी संपर्क केल्यावर त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. शाळेचे विश्वस्त आणि अध्यक्ष फखरुल हसन रिज़वी यांनीही स्पष्टीकरण देण्यास नकार दिला. आम्हाला उर्दू माध्यमात प्रवेश द्यायचाच नाही, तुम्हाला जे वाटते ते लिहा, अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरली.