चेन्नई : तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिणेकडील राजकारणातील अतिशय महत्वाचे व्यक्तिमत्त्व एम. करुणानिधी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. ते द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक)या पक्षाचे प्रमुख होते. त्यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती. त्यांच्यावर चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाबाबत रुग्णालयाने पत्रक प्रसिद्ध केले. वयोमानामुळे त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही, असे रुग्णालयाने म्हटले आहे. एकूण ५ वेळा त्यांनी तामीळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते.
आयसीयूत उपचारांनंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यांच्यावर बुधवारी चेन्नईतील मरीना बीचवर अंत्यसंस्कार केले जातील. तामिळनाडूत राज्य सरकारने सात दिवसांच्या दुखवट्याची घोषणा केली आहे. बुधवारी सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. द्रविड नेत्याच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह इतर नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मोदी आणि राहुल गांधी बुधवारी त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होणार आहेत.