मुंबई : शिवसेना आणि भाजपाची लढाई वैचारिक नसून लुटीमध्ये किती हिस्सा मिळावा यासाठीच आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात शिवसेना खंडणीखोर पार्टी आहे तर त्यांनी शिवसेनेवर एफआयआर दाखल करावी, असा सल्ला सिंग यांनी दिला.
शिवसेना आणि भाजपाने मिळून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार आणि घोटाळे केले आहेत. त्या लुटीमध्ये कोणाला किती हिस्सा मिळावा यासाठीच हे भांडत आहेत. मुंबईकरांनी यापासून सावध झाले पाहिजे. काँग्रेस मुंबईत सर्व वार्डात निवडणूक लढवीत आहे. मुंबईकरांनी काँग्रेसला एक हाती जर सत्ता दिली तर आम्ही दाखवून देऊ कि पारदर्शक कारभार कसा असतो, तेव्हा विकासासाठी कॉंग्रेसला मत द्या, असे सिंग म्हणाले. मुंबईत सगळीकडे देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्सवर फोटो दिसत आहेत, याचाच अर्थ असा आहे कि नोटाबंदीमुळे लोक नाराज झालेले आहेत हे भाजपाला कळले आहे, म्हणूनच नरेंद्र मोदीला होर्डिंगवरून बाजूला केलेले आहे, अशी टीका त्यांनी केली.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी खासदार प्रिया दत्त, माजी आमदार चरणसिंग सप्रा आणि प्रवक्ते अरुण सावंत यावेळी उपस्थित होते.