मुंबई, 4 जून : एल अॅंड टी कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या इमारती व कारखाने उभारणी विभागातर्फे सध्या कार्यरत असलेल्या अथवा निर्माणाधीन अवस्थेतील काही आरोग्यसेवा केंद्रांचे रुपांतर कोविड-19 वरील उपचार केंद्रामध्ये करण्यात आले आहे. लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनीची बांधकाम क्षेत्रातील उपकंपनी असलेल्या ‘एल अॅंड टी कन्स्ट्रक्शन’ने राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याच्या भूमिकेतून व जलद गतीने काम करून काही शहरे व गावांमध्ये इमारतींचे परिवर्तन ‘कोविड-19’साठीच्या रुग्णालयांमध्ये केले आहे. नवी दिल्ली, बिहारमधील चंपारण व मधेपुरा, पुदुचेरी, पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर आणि उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे ही कामे करण्यात आली.
केवळ 3 ते 4 महिन्यांच्या विक्रमी वेळेत 300 खाटांचे (बेड्सचे) रुग्णालय उभारण्याची कंपनीची क्षमता आहे. सध्या सुरू असलेल्या किंवा निर्माणाधीन अवस्थेतील कोणत्याही रुग्णालयाचे रुपांतर ‘कोविड-19’वरील उपचारासाठी आवश्यक त्या सुविधांसह विशेष रुग्णालयात करण्याची क्षमताही या कंपनीकडे आहे, त्याचबरोबर मंगल कार्यालये, शाळा, हॉटेलांमधील खोल्या यांचे रुपांतर विलगीकरण कक्षांमध्ये करण्याचीही कंपनीची तयारी आहे.
‘एल अॅंड टी’चे पूर्णवेळ संचालक आणि बांधकामे, खनिजे व धातू या विभागांचे कार्यकारी उपाध्यक्ष एम. व्ही. सतीश म्हणाले, ‘’एखाद्या आरोग्य केंद्राचे रुपांतर ‘कोविड-19’साठीच्या रुग्णालयात करण्यासाठी आवश्यक असलेले अभियांत्रिकी कौशल्य व बांधकामविषयक क्षमता आमच्याकडे आहे. विशेष रुग्णालये उभारून ‘लार्सन अॅंड टुब्रो’ने ‘कोविड-19’विरुद्धच्या लढ्यात पुन्हा एकदा आपले योगदान दिले आहे. देशासमोर उभ्या राहिलेल्या कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत देशाची सेवा करण्याचे कंपनीचे धोरण आहे. गंभीर आजारासाठीच्या सोयीसुविधा पुरवण्यामध्ये सरकारला मदत करण्यास आम्ही यापुढील काळातही प्रयत्नांची पराकाष्ठा करू.’’
‘’पीएम केअर्स फंडासाठी एल अँड टी समूहाने यापूर्वी 150 कोटी रुपयांची देणगी दिलेली आहे. त्याव्यतिरिक्त, आमच्या विविध साईट्सवरील 1 लाख 60 हजारांहून अधिक कामगारांची आम्ही काळजी घेत आहोत, अनेक राज्यांमध्ये रोकड मदतीचे व कल्याणकारी उपक्रम राबवीत आहोत. ‘एल अँड टी’ने पीपीइ किट, एन-95 मास्क, वैद्यकीय चाचण्यांचे किट्स व अन्य उपकरणांच्या वाटपावर सुमारे 40 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. आमच्या रुग्णालय व्यवसाय विभागाने अनेक सरकारी संस्थांना आरोग्यसेवा सुविधा उभारून दिल्या आहेत,’’ अशी माहिती सतीश यांनी दिली.
‘एल अॅंड टी कन्स्ट्रक्शन कंपनी’तर्फे पुढील रुग्णालयांचे रुपांतर घडविण्यात येत आहे ..
सफदरजंग हॉस्पिटल, नवी दिल्ली :
‘एल अॅंड टी’ने बांधलेल्या, 850 खाटांची सोय असलेल्या सफदरजंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तीन मजले, केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या सूचनेवरून, ‘कोविड-19’च्या रुग्णांसाठी रुपांतरीत करण्यात आले. ‘कोविड-19’ने बाधित रुग्णांची आणि तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्यांची संख्या जशी वाढत जाईल, तसे या रुग्णालयातील अधिकाधिक भाग ‘कोविड’साठी रुपांतरीत करण्यात येत आहेत. यामध्ये आंतररूग्ण विभाग क्र. 1 मध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील 75 खाटांचे रुपांतर विलगीकरणातील रुग्णांसाठी करण्यात आले, विभाग क्र. 2 मध्ये पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील 425 खाटांचे रुपांतर कोविड-19च्या रुग्णांच्या विशेष व सामान्य वॉर्डमध्ये करण्यात आले.
इंदिरा गांधी हॉस्पिटल, नवी दिल्ली :
दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंतीनुसार, द्वारका येथील सेक्टर 9 मधील 700 खाटांच्या निर्माणाधीन अवस्थेतील इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये 200 खाटांचे रुपांतर विलगीकरण कक्षात ‘एल अॅंड टी’ने केले आहे. संपूर्ण तळमजला व पहिल्या मजल्यावरील बाह्य रुग्ण विभाग येथील 200 खाटा अतिशय तत्परतेने ‘कोविड’साठी रुपांतरीत करण्यात आल्या.
सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंपारण, बिहार :
बिहारमधील चंपारण येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयातील तळमजला व पहिला मजल्यावरील 150 खाटांचे रुपांतर विलगीकरण कक्षात करून त्या ‘एल अॅंड टी’तर्फे रुग्णालयाच्या ताब्यात देण्यात आल्या. देशभर टाळेबंदी सुरू असतानाही हे रुपांतराचे काम केवळ 10 दिवसांत पूर्ण झाले. यामध्ये आवश्यक प्रकाशयोजना व स्वच्छतागृहांची सोय असलेला तात्काळ सेवा विभाग, वैद्यकीय वायूपुरवठा यंत्रणा, पडद्यांची सुविधा, तात्पुरता सेप्टिक टॅंक, वीज मंडळाकडून तात्पुरता वीजपुरवठा आणि ‘कोविड-19’च्या विभागाकडे जाणारा सिमेंटचा स्वतंत्र रस्ता अशी कामे करण्यात आली.
सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मधेपुरा, बिहार :
बिहार राज्य सरकारच्या वतीने मधेपुरामध्ये वर्षाकाठी 100 विद्यार्थी क्षमतेचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांची सोय असलेले महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालय एल अॅंड टी उभारत आहे. बिहार सरकारच्या विनंतीवरून, महाविद्यालयातील एक मोठा भाग कोविड-19 रुग्णांच्या चाचण्यांसाठी प्रयोगशाळेमध्ये ‘एल अॅंड टी’कडून रुपांतरीत करण्यात येत आहे. ‘बीएसएल-3’ दर्जाची ही अत्याधुनिक प्रयोगशाळा राज्य सरकारला ‘कोविड-19’च्या उपचारांमध्ये मोलाची ठरेल.
जेआयपीएमइआर, फेज-3, पुदुचेरी :
येथील जुने रुग्णालय आणि संस्थेच्या इतर इमारतींचे ‘एल अॅंड टी’तर्फे आधुनिकीकरण करण्यात आले, तसेच एसएस ब्लॉकचा विस्तार व जेआयपीएमइआर येथे बाह्यरुग्ण विभागातील तपासणी कक्ष ही कामेदेखील करण्यात आली. ‘एसएसबी विशेष ब्लॉक’ हा ‘एल अॅंड टी’नेच रचना करून बांधला होता व 2019मध्ये ‘जेआयपीएमइआर’कडे सुपूर्द केला होता. तो कोविड-19 रुग्णांच्या उपचारांकरीता पुदुचेरी प्रशासनाच्या आवश्यकतेनुसार सुधारून घेण्यात आला. पहिल्या मजल्यावरील 50 खाटांचे रुपांतर विलगीकरण कक्षात आणि दुसऱ्या मजल्यावरील 100 खाटांचे रुपांतर विशेष कक्षात करण्यात आले. हा प्रकल्प अद्याप ‘जेआयपीएमइआर’कडे पूर्णपणे हस्तांतरीत करण्यात आलेला नसला, तरी त्यामधील सुसज्ज असा सुपर स्पेशालिटी ब्लॉक उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल वैद्यकीय महाविद्यालय, डायमंड हार्बर, पश्चिम बंगाल :
पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर येथे पश्चिम बंगाल राज्य सरकारसाठी शंभर विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय ‘एल अॅंड टी’कडून बांधण्यात येत आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरून वैद्यकीय महाविद्यालयातील एक भाग कोविड-19 चाचण्यांच्या प्रयोगशाळेसाठी रुपांतरीत करण्याचे काम एल अॅंड टी करीत आहे. ही प्रयोगशाळा ‘बीएसएल-3’ दर्जाची असून राज्य सरकारला ‘कोविड-19’च्या रुग्णांवर उपचार करण्यात ती राज्य सरकारला मोलाची मदत करणार आहे.
एआयआयएमएस गोरखपूर, उत्तर प्रदेश :
एआयआयएमएस गोरखपूर येथे प्रतिवर्षी 150 विद्यार्थी क्षमतेचे सरकारी महाविद्यालय आणि 750 खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय बांधण्याचे काम ‘एल अॅंड टी’तर्फे केंद्रिय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या सूचनेवरून सुरू आहे. उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या विनंतीवरून, या महाविद्यालयातील एका मोठ्या भागाचे रुपांतर कोविड-19 चाचण्यांच्या प्रयोगशाळेमध्ये करण्यात येत आहे.