रत्नागिरी, (आरकेजी) : लोटे एमआयडीसीतून सोडल्या जाणार्या रसायनमिश्रीत पाण्याचे दुष्परिणाम खाडी पट्टा आणि लोटे एमआय़डीसी परिसरात जाणवू लागले आहेत. त्यामुळे तेथे राहणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. कॉमन इमफ्लुईन्ट ट्रिटमेंट फ्लॅन्टच्या चेंबरमधून मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रीत पाणी नदी नाल्यांमध्ये वाहत जात आहे. अनेक दिवसांपासून या फ्लँन्टच्या चेंबरला गळती लागली आहे. त्यामुळे रसायनमिश्रीत पाणी थेट इथल्या नाल्यांमधून शेतक-यांच्या शेतात जात आहे. नदीमधील मासे देखील मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज लोटे परिसरातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते, आधी हे पाणी बंद करा अशी मागणी लोटे परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. याच पाण्यामुळे दाभोळ खाडीतील मासे मृत होण्याचं प्रमाण वाढले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकारांकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.